मनसेच्या पुणे शहाराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी आज खळबळजनक माहिती दिली. शिवाय, मी शहराध्यक्ष पदाचा मे महिन्यात राजीनामा देणार आहे, हे मी राज ठाकरे यांना मागील महिन्यातच ते जेव्हा पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हाच सांगितलं होतं. अशी माहिती देत वसंत मोरे यांनी त्यामागील कारण देखील सांगितलं आहे.

शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे यांनी सांगितले की, “राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून जी भूमिका मांडली होती, त्यामध्ये मी कुठल्याही भूमिकेशी फारकत घेतली नव्हती. परंतु, फक्त मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी अडचण काय होत आहे, मी इथे काम करत असताना मला नक्की काय समस्या आहे? हा मी माझा, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मागील १५ वर्षाचा जो अनुभव आहे तो मी मांडला होता आणि मी तेवढच फक्त म्हणालो होती की लोकप्रतिनिधी म्हणून मला अडचण होईल. एवढच मांडलं होतं.”

तसेच, “मला खरं बोलण्याची शिक्षा अनेकदा मिळालेली आहे, त्यामुळे मला वाटतं की मी माझ्या जागेवर ठीक आहे. परंतु ज्यांनी कोणी ते तिथपर्यंत पोहचवलं असेल, ते त्यामध्ये यशस्वी झाले. त्यांना आता पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्यावं.” असंही वसंत मोरे यावेळी म्हणाले.
याचबरोबर, “मला जेव्हा शहराध्यक्ष पद द्यायचं होतं, तेव्हा राज ठाकरे यांनी मी एक प्रश्न विचारला होता की, मी शहराध्यक्ष का नको? त्यावर मला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, तू एक लोकप्रतिनिधी आहेस आणि लोकप्रतिनिधी असताना तुला जर शहराध्यक्ष करायचं असेल, तर शहराध्यक्ष म्हणून अनेक भूमिका घ्याव्या लागतात. त्यावेळेस मला असं काही वाटलं नव्हतं की, असे काही विषय येतील आणि त्यावरून अशा अडचणी निर्माण होतील.” अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

याशिवाय, “मागील महिन्यात जेव्हा राज ठाकरे पुण्यात आले होते, तेव्हा मी त्यांच्यासमोर भूमिका मांडली होती की, शहरात काही असंतुष्ट आत्मे आहेत ज्यांच्यामुळे पक्ष वाढत नाही. ज्यांच्यामुळे केवळ आणि केवळ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्या लोकासोबत मी काम करू इच्छित नाही, मी मे महिन्यात शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्याला कुणाला शहराध्यक्ष करायचं असले, त्याला बिनधास्त करा. असं मी म्हणालो होतो.” अशी देखील माहिती वसंत मोरे यांनी आज प्रतिक्रिया देताना दिली.

तर, “भोंग्याचा पहिला बळी वैगरे काही नाही, राज ठाकरेंचा जो आदेश असतो तो आदेश असतो. त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे माझ्या सारख्या महाराष्ट्र सैनिकासाठी एकप्रकारे आदेशच आहे, त्यामुळे महाराष्ट्र सैनिक म्हणून आहे.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

अन्य कुठल्या पक्षात तुम्ही जाणार का? –

या प्रश्नावर उत्तर देताना वसंत मोरे म्हणाले, “माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही. निवडणूक अजून सहा महिने लांब आहे, पूलाखालून खूप पाणी जायचं आहे. काही निर्णय घ्यायचा असेल तो माझे कार्यकर्ते, माझी घरची लोक, माझ्यापेक्षा मोठी लोक त्यांच्या सर्वांसोबत बोलेन. पण माझ्या आताच्या भूमिकेशी मी ठाम आहे, मी महाराष्ट्र सैनिक आहे आणि माझे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे माझ्या भूमिकेसोबत असतील.”

चांगल्या कार्यकर्त्याला बाजूला केलं असं बोललं जात आहे, आज आपली काय भावना आहे? –

यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, “मला असं काही वाटत नाही कारण, शहराध्यक्ष पद हे मी राज ठाकरे यांच्याकडून मागून घेतलं होतं. त्यामुळे ते असलं काय आणि नसलं काय? मी आजपर्यंत कायम पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी भविष्यात देखील पक्ष वाढवताना दिसेल. साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष केल आहे. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे संपूर्ण पुणे शहरांनी पाहीलं आहे की, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्हाला मनपा सभागृहात देखील बघताना संताजी-धनाजी म्हणून बघतात. आम्ही ज्या काही भूमिका मांडतो, जे काही कामं करतो. ते आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून मागील पाच वर्षांत अतिशय मोठा संघर्ष केला आहे. साईनाथ बाबर यांनी त्यांच्या भागात केला आहे, मी देखील माझ्या भागात केला आहे. त्यामळे भविष्यात आम्हीच शहरात काम करू, यामध्ये काहीच दुमत नाही.”

राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन तुमच्या प्रभागात होणार का? –

“ज्या मुद्यावरून एवढा मोठा वाद झाला, त्या विषयाशी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हणेन की मला माझ्या भागात शांतता हवी आहे.” तसेच, “आज जे कार्यकर्ते माझ्या कार्यलयावर जमले ते माझ्यावरील प्रेम आहे. १५ वर्षे मी जे केलं त्याचा आज मला आज अभिमान वाटतो. मी जे १५ वर्षे जे पेरलं ते मला आज या दोन-चार दिवसांत दिसलं. सर्वांनी शांत रहावं, काही कुणी घाबरण्याचं कारण नाही, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी मनसेमध्ये असणार.” अशा शब्दांमध्ये वसंत मोरे यांनी भूमिका स्पष्ट केली.