मला कोणी विचारले की तुम्हाला काय व्हायचे आहे तर मी लगेच सांगेन की मला लोकांच्या मनातील गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. शत्रूदेखील गोपीनाथ मुंडे यांना विसरु शकत नाही असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे तो त्यांची मुलगी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला पिंपरी महापालिकेचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अमर साबळे, आझम पानसरे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे या सगळ्यांचीही उपस्थिती होती.

विरोधक कायम माझ्यावर टीका करतात की मी रडून मते मागते, भावनेचे राजकारण करते. मात्र माझे राजकारण भावनेने केलेले राजकारण आहे भावनिक राजकारण नाही असे राजकारण करणे मी गोपीनाथ मुंडेंकडूनच शिकले आहे. ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग आहे तिथे निवडणुका असतील तर विरोधकांनाही गोपीनाथ मुंडे यांचे नाव घ्यावेच लागते असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,कॉलेज जीवनात गोपीनाथ मुंडे यांनी जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढवली मात्र सतत तीन वर्षे ते एका मताने निवडणुकीत पराभूत झाले. आपण एकाच मतावरून पराभूत का झालो हे अभ्यासले पाहिजे असे ते म्हणत. याच काळात त्यांची मैत्री प्रमोद महाजन यांच्याशी झाली. आपण सोबत काम केले पाहिजे, युती केली पाहिजे असे या दोघांनी ठरवले आणि गोपीनाथ मुंडे निवडणूक जिंकले अशी आठवणही त्यांनी सांगितली. गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात यायचे ठरवले त्यावेळी भाजपचा जन्मही झाला नव्हता. गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते संयमी होते, राजकारणात त्यांचा राग कोणीही केला नाही इतकी त्यांची ताकद होती असेही पंकजा म्हणाल्या.

२००९ च्या निवडणुकांमध्ये मी बाबांकडून खूप काही शिकले, मी म्हणायचे तुम्ही मला एवढी मेहनत का करायला लावता? अधिवेशन बुडवायचे नाही, महाराष्ट्रात दौरे करायचे, आंदोलनात भाग घ्यायचा हे सगळे का? तेव्हा ते मला सांगायचे तुला माझी उरलेली स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांचे हे म्हणणे ऐकले की मी हिरीरीने काम करायला लागायचे. अशाच प्रकारे बाबा माझ्यावर जबाबदारी टाकत गेले आणि मला घडवत गेले. मी आज जी काही उभी आहे ती फक्त त्यांच्यामुळेच. माझ्यात त्यांची झलक दिसते असे लोक म्हणतात म्हणूनच मी कायम सांगते की मला लोकांच्या आठवणीतील गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.