‘गो करोना गो’ म्हणत होतो! मात्र, मलाच करोना झाला, त्यामुळे आता…” आठवलेंचा नवीन डायलॉग

करोना काळात आठवले यांचा ‘गो करोना गो’ हा डायलॉग खुप व्हायरल झाला होता

Athavale new dialogue
राज्यमंत्री रामदास आठवले पुण्यात बोलत होते ( photo indian express)

“पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. ‘गो करोना गो’ म्हणत होतो. मात्र, मलाच करोना झाल्याने मी आता ‘नो करोना नो’ म्हणतो” असे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. करोना काळात आठवले यांचा ‘गो करोना गो’ हा डायलॉग खुप व्हायरल झाला होता.

रामदास आठवले म्हणाले, “करोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर व पालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या प्रमाणात योजना आखल्या. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून दिले, रुग्णालय उभे केले. आता तिसरी लाट आली, तरी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. राज्यांना मदत गेली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर आपण मात करू शकतो.”

हेही वाचा- “स्वप्नील लोणकरसारखा मार्ग कोणी पत्करला तर…”; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना इशारा

शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करावी

“राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे,” असे रामदास आठवले म्हणाले.

भविष्यातही भाजपसोबतच राहणार

“रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I was saying go corona go however it happened to me so now athavale new dialogue srk