पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार वाशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू असून, खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले आहेत. खेडकर यांनी छळ झाल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत. हेही वाचा >>> गोखले संस्थेतील वाद शमवण्याचे प्रयत्न; पत्र‘फुटी’चीही चौकशी खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची वाशिम पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. त्यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली. प्रशिणार्थी असताना खेडकर यांनी खासगी आलिशान मोटारीला ‘अंबर दिवा’ लावला. मोटारीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन घेतले, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी खेडेकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनीतक्रार केली. खेडकर प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठविला. त्यानंतर खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदवावा, असे समन्स बजाविण्यात आले आहेत. - अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे