पुणे : देशात मागील काही वर्षांत विदाचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका विदाचोरीच्या घटनेसाठी सरासरी २५.५ कोटी रुपयांचा भुर्दंड कंपन्यांना बसत असल्याचे ‘आयबीएम’च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षी हा सरासरी भुर्दंड २२ कोटी रुपये होता आणि त्यात आता सुमारे १५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

‘आयबीएम’ने ६०२ कंपन्यांकडील मार्च २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील विदाचोरीच्या घटनांचे विश्लेषण केले. त्यानंतर यातील ४५६ कंपन्यांबरोबर या वर्षी मे महिन्यात अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात विदाचोरीच्या ३९ हजार ५०० घटना घडल्या आहेत. त्याआधीच्या वर्षात अशा ३८ हजार २०० घटना घडल्या होत्या. कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाधारित विदाचोरीचे प्रकार वाढू लागले. विदाचोरीच्या घटनांमध्ये ‘एआय’ आधारे झालेले २६ टक्के प्रकार आहेत. ‘एआय’मुळे सायबर हल्ले अधिक जलद आणि व्यापक पातळीवर होत आहेत. ‘एआय’मुळे सायबर हल्ल्यांचे स्वरूप बदलू लागले आहे. याच वेळी या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपन्यांकडून सायबर सुरक्षा भक्कम केली जात आहे. विदाचोरीच्या घटनेनंतर ७३ टक्के कंपन्यांनी सुरक्षा साधनांसाठी गुंतवणूक वाढविण्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर प्रशासनात सुधारणा करण्यावर भर देण्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे.

‘एआय’ आणि स्वयंचलित सुरक्षा यंत्रणेचा वापर केवळ ३२ टक्के कंपन्यांकडून होत असून, ३६ टक्के कंपन्या ‘एआय’चा मर्यादित वापर करीत आहेत. याच वेळी ३२ टक्के कंपन्यांकडून ‘एआय’चा वापरच होत नाही. सुरक्षा यंत्रणेत ‘एआय’ आणि स्वयंचलित यंत्रणेचा वापर नसलेल्या कंपन्यांना एका विदा चोरीसाठी ३१.६ कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. याच वेळी ‘एआय’चा वापर करणाऱ्या कंपन्यांना २१.३ कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वित्तीय कंपन्यांना सर्वाधिक फटका

विदाचोरीचा सर्वाधिक फटका वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे. एका विदाचोरीसाठी वित्तीय कंपन्यांना ४०.९ कोटी रुपयांचा भुर्दंड बसतो. त्याखालोखाल तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी ३५.७ कोटी रुपये आणि दळणवळण क्षेत्रातील कंपन्यांसाठी ३४.५ कोटी रुपयांचा भुर्दंड बसतो, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताकडून ‘एआय’च्या स्वीकाराला गती मिळाली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नावीन्यतेच्या संधी उपलब्ध होत आहेत. ‘एआय’चा वापर करणाऱ्या आणि भक्कम प्रशासन असलेल्या कंपन्या सायबर हल्ले रोखण्यासाठी अधिक सक्षम आहेत. सध्या अनेक कंपन्यांकडून मर्यादित स्वरुपात ‘एआय’चा वापर केला जात असून, त्यात सायबर हल्ले शोधण्यावर अधिक भर दिला जात आहे. मात्र, स्पर्धात्मकतेत टिकून राहण्यासाठी भारतीय कंपन्यांना व्यवसायात ‘एआय’चा अधिकाधिक वापर करावा लागेल.- गौरव अगरवाल, उपाध्यक्ष, ‘आयबीएम’ इंडिया व दक्षिण आशिया