पुणे : इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सच्या (आयसीएसआरआय) वतीने सोनल हॉल येथे ‘दुर्मीळ नाण्यांचे’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नाणी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
‘आयसीएसआरआय’च्या वतीने प्रसिद्ध नाणकशास्त्र तज्ज्ञ डॉ. के. के. माहेश्वरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. दिलीप राजगोर, किशोर चांडक, अशोकसिंग ठाकूर या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्येन वेलणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच, मुंबईचे फारूख एस. तोडीवाला, मुंबईचे डॉ. दिलीप राजगोर आणि जामखेडचे पोपटलाल हळपावत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. फारूक तोडीवाला यांच्या वतीने मॅलकम तोडीवाला यांनी पुरस्कार स्वीकारला. या प्रदर्शनात स्मरणिकेचे आणि डॉ. दिलीप राजगोर, आशुतोष पाटील आणि मनीष मोरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. माहेश्वरी म्हणाले, ‘चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या पारंपारिक शिक्षणाव्यतीरिक्त छंदातून मिळणारे शिक्षण हे समृध्द करीत असते. आज इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स, अर्थात आयसीएसआरआय पुणेच्या प्रोत्साहनामुळे संग्रहाकांची संख्या वाढली असून हा विषय केवळ छंदापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर विविध रेकॉर्ड प्रस्थापित करीत आहे. चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त छंदातून मिळणारे शिक्षण हे समृद्ध करीत असते. नव्या पिढीलाही संग्रहांच्या क्षेत्रात उत्सुकता दिसत असून, हे आशादायक चित्र आहे. नवीन पिढीने संग्रहांचा छंद एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. आज इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सकडे ४७ लिम्का रेकॉर्ड होल्डर तर दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत, हे एक्सलन्सचेच प्रतिरूप आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ’
‘आज नाण्यांच्या रूपात इतिहास आणि संस्कृतीचे जतन करणारा ‘एनसायक्लोपिडिया’ इथे पाहायला मिळाला. खाद्य, वस्त्र आदी क्षेत्रांतील आपली समृद्ध गौरवशाली परंपरा काळाच्या पडद्याआड लुप्त होत असून, तिचे जतन होणे आवश्यक आहे,’ अशी भावना अशोकसिंग ठाकूर यांनी व्यक्त केली.
नितीन मेहता यांनी पुरस्कारार्थींच्या मानपत्राचे वाचन केले. श्याम मोटे आणि कमलेश मोतीवाला यांनी स्वागत केले. किशोर चांडक यांनी प्रास्ताविक केले. बस्ती सोळंखी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र शहा यांनी आभार मानले.
‘प्रदर्शन रविवारपर्यंतच’
प्रदर्शनात रसिकांना दुर्मिळ नाण्यांचा खजिना जसे की छत्रपती शंभू राजे, छत्रपती शिवाजी राजे, विदेशी फॅन्सी नाणी रविवार दिनांक २१ डिसेंबर पर्यंत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत सोनल हॉल, कर्वे रस्ता, पुणे येथे मोफत पाहता येणार आहेत.
