हिरवा कोपरा : बीज अंकुरे अंकुरे

आपल्या बागेत भाजीपाला लावण्यासाठी बियाण्याची तजवीज करायला हवी.

बियांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी तसेच कोवळ्या कोंबांचे किडींपासून संरक्षण व्हावे यासाठी बीज प्रक्रिया करावी.

आला पह्य़ला पाऊस शिपडली भुई सारी

धरत्रीचा परमय माझं मन गेलं भरी

आता ऊगू दे रे शेत आला पाऊस पाऊस

वहे येऊ दे रे रोप माझी फिटली हाऊस

बहिणाबाईंनी शेतक ऱ्यांच्या मनातले भाव टिपले. पहिला पाऊस होऊन गेला अन् मातीच्या पोटात दडलेलं बीज तरारून वर आले आहे. कोवळी लुसलुशीत हिरवी हिरवी गवताची पाती माळराने अंगाखांद्यावर मिरवत आहेत. पहावं तिकडे भूछत्र्या डोकावत आहेत. कंदांना धुमारे फुटले आहेत, आपणही या सृजन यात्रेत सामील व्हायलाच हवे.

आपल्या बागेत भाजीपाला लावण्यासाठी बियाण्याची तजवीज करायला हवी. फळभाज्यांसाठीचे बी शेतीमालाच्या दुकानात मिळते. वांगी, मिरची, टोमॅटो, गोवारी, भेंडी, घेवडा, ढब्बू मिरची बी आणावे. बियांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी तसेच कोवळ्या कोंबांचे किडींपासून संरक्षण व्हावे यासाठी बीज प्रक्रिया करावी. गोमूत्र व पाणी १:१० प्रमाणात मिसळून त्यात बिया दहा तास ठेवून मग वाळवून लावाव्या. निरगुडी, करंज व तुळशीची पाने सम प्रमाणात घेऊन त्याचा अर्क काढून त्यामध्ये पाणी मिसळून त्यात बी भिजवून नंतर वाळवून लावावे. वेखंडाची पावडर पाण्यात मिसळून त्या पाण्यातही बी भिजवून वाळवून लावता येते. आंबट दही व आंबट ताकामध्ये हरभरा शिजवून लावणे, आम्लधर्माने बी चे संरक्षण होते. मोहरीचे तेल बियांना चोळल्यास संरक्षण होते. काहीच नाही तर बिया उन्हात खडखडीत वाळवून लावाव्यात. बाजारात यासाठी ट्रायकोडरमा बुरशी मिळते. पण घरगुती उपाय सोपे पडतात. वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा, शेवगा याचे बी प्लॅस्टिकच्या खास रोपांसाठी केलेल्या ट्रेमध्ये लावावीत अन्यथा छोटय़ा टोपलीत बी टाकून रोपं करावीत. ट्रेमध्ये कोकोपीथ व नीमपेंडचे मिश्रण भरून प्रत्येक खळग्यात एक बी लावणे. कोकोपीथमुळे मुळांना ओलावा मिळतो व त्याचा भुसभुशीतपणा नव्या कोवळ्या मुळांच्या वाढीस पोषक ठरतो. रोप काढून दुसरीकडे लावणं सोपं जातं. रोपांना चार-सहा पाने आली, की आपल्याला हव्या त्या जागी लावावीत. रोप अधिक काळ ट्रेमध्ये राहिल्यास मुळांची दाटी होते व दुसरीकडे लावल्यावर त्याची वाढ खुंटते. अशा वेळी रोपाच्या तळाशी असलेली गच्च मुळे अलगद हाताने मोकळी करावीत व त्याची टोके कापावीत.

वेलवर्गीय भाज्या लावण्यासाठी पण बाजारात बियांची पाकिटे मिळतात. पण त्याऐवजी आपण आधी लावलेल्या दुधी, दोडका, घोसाळे, कारले, पावटा, डबल बी, काळी रेशीम पापडी याचे फळ वा शेंगा जून होईपर्यंत वेलावर ठेवून नंतर त्याचे बी नवीन लागवडीसाठी वापरता येतात. एकाच फळात खूप बिया मिळतात. ज्या इतरांनाही वाटता येतात. अर्थात फार जुने बी असेल तर त्याची उगवणक्षमता कमी झालेली असते. बिया पाण्यात टाकून ठेवाव्यात. तरंगणाऱ्या बिया पेरण्यासाठी वापरू नयेत.

मेथी, पालक, शेपू, आंबटचुका, राजगिरा, चवळई, चाकवत यांचे बी दहा रुपयांत मिळते. तेवढे पुरते. घरातली मोहरी टाकून मोहरी लावता येते. नंतर त्याचेच दाणे पुन्हा लावण्यासाठी वापरता येतात. धने लावताना चोळून दोन पाकळ्या झाल्या की कोमट पाणी वा गोमूत्राच्या पाण्यात भिजवून वाळवून लावाव्यात.

बीट, गाजर, मुळा, नवलकोलच्या बियाण्याची पाकिटे मिळतात. या बिया तीन विटांच्या वाफ्यात अथवा क्रेटमध्ये लावाव्यात.

पपईच्या बियांना लगेच बुरशी लागते. बिया टिकवण्यासाठी त्यास राख चोळून ठेवावी. आम्ही राखेचाच वापर जास्त करतो.

इवलेसे बी पण त्याच्या वाणाचे महत्त्व खूप आहे. विशेष करून स्थानिक जातीचे! धुळ्याचे हिरवे भरताचे वांगे, माणगावचे कापाचे वांगे, कृष्णा काठचे हिरवे, लुसलुशीत वांगे, काटेरी जांभळे वांगे, बिन काटय़ाचे लठ्ठ जांभळे वांगे, मावळातले रान वांगे, स्थानिक प्रजातीच्या चवींचे वैशिष्टय़ वेगवेगळे आहे. म्हणूनच त्या टिकणे महत्त्वाचे आहे. यासाठी ज्यांच्याकडे अस्सल गावरान जाती असतील, त्यांनी त्याची रोपं करून वाटावीत. अन्यथा नव्या सुधारित जातींच्या रेटय़ात स्थानिक वाण लुप्त होईल. काही सुधारित जातीत बी परिपक्व होत नाही. त्यापासून नवीन रोप फळत नाहीत. मग शेतक ऱ्यास या बाजारी बियाण्यावर अवलंबून राहावे लागते. कारण यापासून खूप उत्पन्न मिळते. आपण हौशी लोक या स्थानिक जातींना सांभाळू शकतो.

हे बीज माहात्म्य अपार आहे. मार्चमध्ये काढलेला लाल भोपळा आषाढीस कापला अन् भोपळ्यातील अनेक बिया आसुसल्या होत्या, अंकुरल्या होत्या रुजण्यासाठी. ते पाहून थक्कच झाले. आत्मज्ञानाचे बीज आपल्या मनात रुजवणाऱ्या गुरूंना आपण वंदन केले. पण विजिगीषू वृत्तीने रुजणारे, स्वधर्म, स्वगुणाने स्वशिदोरीवर फळणारे इवलेसे बीज गुरूच नाही का?

ज्ञानदेव म्हणतात ‘नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप

तैसे परिणमले रूप माझे जीवा’

या निसर्गतत्त्वासही आपण वंदन करू या.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ideas for growing vegetables in home garden

ताज्या बातम्या