पुणे शहरातील मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे तातडीने उतरवावेत किंवा कायमस्वरुपी बंद ठेवावेत. त्यासाठी मौलवींनी पोलिसांच्या माध्यमातून तशी ग्वाही द्यावी. अन्यथा पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता हेमंत संभूस, अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे आणि बाळा शेडगे यांनी याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त कार्यालयाला दिलं आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेचं आंदोलन सुरू झालं असून ते पुढे चालूच राहणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून या आदेशाचे पालन करण्यात येईल. पुणे शहरात ४०० ते ४५० मशिदी आहेत. त्यातील जवळपास सर्वच मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे उतरवावेत किंवा कायमस्वरूपी बंद अवस्थेत ठेवावेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसेनं आपल्या निवेदनात पुढे म्हटलं की, अजानला आमचा विरोध नाही. मात्र भोंग्यांद्वारे ती होऊ दिली जाणार नाही. त्यामुळे मशिदींचे मौलवी यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांच्या मध्यस्थीने तशी ग्वाही द्यावी. मौलवींनी अशा प्रकारची ग्वाही दिली नाही, तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात भोंग्यांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मशिदीवरील भोंगे न हटवल्यास त्या समोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्या आदेशानुसार मनसेचे कार्यकर्ते ४ मेपासून आक्रमक झाले आहे. दरम्यान पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत, त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या सर्व चर्चांनंतर अखेर साईनाथ बाबर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली.

“मी दोन दिवसापासून नॉट रिचेबल होतो, अशी चर्चा सोशल मीडियावर पाहण्यास मिळाली. परंतु मी जरी फिल्डवर नव्हतो, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याप्रमाणे पडद्यामागे राहून काम करत होतो. पुण्यातील आंदोलनाची जबाबदारी राज्य चिटणीस अजय शिंदे यांच्याकडे होती. तर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी किशोर शिंदे यांच्याकडे होती,” अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी मांडली.