पाकिस्तानमधील गरिबी दूर झाल्यास ते कधीही भारताशी युद्ध करण्याचा विचार करणार नाहीत, असे विधान योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. ते गुरूवारी पुण्यात सुरू असलेल्या ७व्या छात्र संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पतंजली समुहाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. आगामी काळात पतंजली समूह नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिकेमध्ये योगाचा आणि व्यवसायाचा विस्तार करणार आहे. त्याठिकाणी पतंजली समूहाला मिळणारा नफा गरीबांच्या विकासासाठी वापरण्यात येईल. याशिवाय, पाकिस्तानमध्येही पतंजली समूहाचा विस्तार करण्याची आमची योजना आहे. आतापर्यंत पतंजलीने एक लाख लोकांना रोजगार दिला आहे. पाकिस्तानमधील गरिबी दूर झाल्यास भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व कायमचे संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तान भारताशी युद्धाचा विचार करणार नाही, असे यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले. मी कोणत्याही मुसलमानाकडे पाहतो तेव्हा मला त्याच्यात आपले रक्त दिसते, या बाबा रामदेवांच्या विधानानेही अनेकांच्या भुवया उंचवल्या.

दरम्यान, यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी परदेशी कंपन्यांच्या कारभारावरही टीका केली. परकीय कंपन्या भारतात एक रूपया गुंतवतात व १०० रूपये घेऊन जातात. या कंपन्या देशातील कोणत्याही विकासकामांना हातभार लावत नाहीत. आजपर्यंत या कंपन्यांमुळे लाखो कोटी रूपये देशाबाहेर गेले. मात्र, पंतप्रधानांच्या नोटाबंदीनंतर देशात १८ लाख कोटी आले, असा दावा यावेळी बाबा रामदेव यांनी केला. तसेच आगामी वर्षात पतंजली समूहाच्या व्यवसायाची उलाढाल १० हजार कोटीपर्यंत, तर पुढील पाच वर्षात ही उलाढाल एक लाख कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आम्ही कोणत्याही तंबाखू किंवा दारू उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून देणगी स्वीकारत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.