रावसाहेब दानवे यांचे मत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच भाजपचे शत्रू क्रमांक एक आहेत. कोणाच्याही टीकेचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नसून त्यांना मतदारच मतदानातून उत्तर देतील. शिवसेनेच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची आणि दखल घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी महापालिका प्रचारातील पक्षाची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

केंद्रातील आणि राज्यातील चांगल्या कामामुळे पक्षाकडे उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांचा ओघ होता. पुण्यात १५२ जागांसाठी एक हजार अर्ज आले होते. ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी तिकीटवाटपात पैसे घेतले गेले असे आरोप केले असून त्यात काहीही तथ्य नाही. महापालिका निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला दहा लाखांची मर्यादा आहे. पक्षातर्फे शहरात जो एकत्रित खर्च करावा लागतो, तो खर्च आयोगाने उमेदवारांच्या नावे टाकला आणि दहा लाखांची मर्यादा ओलांडली गेली, तर उमेदवाराची निवडणूक रद्द होऊ शकते. म्हणून दहा लाखांपैकी दोन लाख रुपये धनादेशाद्वारे पक्षाकडे जमा करावेत आणि सर्व उमेदवारांवर सारखाच खर्च करावा यासाठी म्हणून पक्षांतर्गत व्यवस्था केली आहे, असे दानवे यांनी सांगितले.

ऑनलाइन अर्ज भरताना हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. निवडणूक यंत्रणा सक्षम आहे. निवडणूक आयोग वा न्यायालयाकडे तक्रार करावी, असेही दानवे म्हणाले. लक्ष्मी दर्शनाच्या प्रश्नाला बगल देत पुण्याचे वातावरण प्रदूषित न करता प्रचार करू आणि जिंकू, असेही ते म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

दानवे यांच्या मते..

* मुंबईत शिवसेना आणि काँग्रेसची हातमिळवणी झाली असून जेथे काँग्रेस कमकुवत तेथे सेनेला मदत आणि जेथे सेना कमकुवत तेथे काँग्रेसला मदत, अशी दोन्ही पक्षांची रणनीती

* निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाची ध्येय धोरणे पाळणाऱ्यांना उमेदवारी

* विरोधी पक्षांच्या लोकांना तिकिटे देताना स्थानिक नेत्यांनी सर्व चौकशी केली असेल, त्यामुळे अशांना तिकिटे देण्याला हरकत नाही