माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात आघाडीवर असलेले शहर..पुणे राज्यात माहिती तंत्रज्ञानातील सर्वाधिक कंपन्या पुण्यात.. नव्या कंपन्या सुरू करण्यासाठी उद्योगांकडून प्राधान्य दिले जाणारे शहर पुणे. असे सगळे असतानाही भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) नागपूरला सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आयआयआयटीच्या निमित्ताने शासनाने पुण्याला तिसऱ्यांदा ठेंगा दाखवला आहे.
राज्यातील पहिले आयआयआयटी सुरू करण्यासाठी केंद्राने नुकतीच मंजुरी दिली. नागपूर येथे ही संस्था सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यापूर्वी राष्ट्रीय विधी विद्यालय (नॅशनल लॉ स्कूल), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या दोन्ही संस्थांही पुण्यात सुरू होण्याची चर्चा होती. मात्र, या संस्थाही नागपूर येथेच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले आयआयआयटी सुरू करण्यासाठी पुणे आणि नागपूर असे दोन पर्याय शासनासमोर होते. आता तिसऱ्यांदा पुण्याला डावलून राज्य शासनाने पुन्हा एकदा पुण्याला ठेंगा दाखवला आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील आघाडीचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सुरू करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून देशभरात बंगळुरूनंतर पुण्याला प्राधान्य देण्यात येते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण गुंतवणुकीपैकी साधारण ११ टक्के गुंतवणूक ही पुण्यात होते. पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने दरवर्षी १५ ते १८ टक्क्य़ांची वाढ नोंदवली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात नव्याने सुरू होणाऱ्या कंपन्यांपैकी साधारण १५ टक्के कंपन्या या पुण्याला प्राधान्य देत असून; सध्या पुण्यात कंपनी सुरू करण्यासाठी शंभरहून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली असल्याचे निरीक्षण नासकॉमने नोंदवले आहे. असे असतानाही पुण्याला डावलण्यात आले आहे. यामुळे पुण्याचा सध्याच्या लौकिकात बदल होणार नसला किंवा खूप नुकसान होणार नसले तरीही फायदा मात्र कमी होऊ शकतो. पुण्यात आयआयआयटी सुरू झाले असते, तर अधिक गुंतवणूकदार पुण्यात वळले असते असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

एखाद्या शहरात जेव्हा अशी मोठी संस्था सुरू होते, तेव्हा ते अर्थातच उद्योगांसाठी पोषक असते. या संस्थांमुळे त्या शहराचे ब्रँडिंगही होत असते. आयआयआयटी पुण्यात सुरू झाले असते, तर त्याचा पुण्याला नक्कीच फायदा झाला असता. मात्र, आता नागपूरला ही संधी मिळाली आहे.
– परेश देगावकर, नासकॉमचे पुणे विभागाचे संचालक