पुणे : भारतीय माहिती-तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी पुणे) आता तळेगावनजीक नाणोली गावातील १०० एकरांतील संकुलात स्थलांतरित झाली आहे. संस्थेत सध्या पाच वसतिगृहे आहेत. येत्या दोन वर्षांत १५०० विद्यार्थ्यांसाठी आणखी दोन नव्या वसतिगृहांचे बांधकाम केले जाणार आहे. क्रीडा सुविधाही विकसित करण्यात येत आहेत. या संपूर्ण सुविधा निर्मितीसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी संस्थेला उपलब्ध झाला आहे.
आयआयआयटी, पुणेचे संचालक डॉ. विनीत कंसल यांनी याबाबतची माहिती दिली. कुलसचिव डॉ. नागेंद्र कुशवाह, डॉ. जतीन मजीठिया, डॉ. भूपेंद्र सिंह, डॉ. दिव्या चतुर्वेदी, डॉ. सांगा चकी, डॉ. हाबिला बसुमतारी आदी उपस्थित होते.
डॉ. कंसल म्हणाले, की संस्था स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाल्यामुळे आता नवे अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता वाढवता येणार आहे. त्या दृष्टीने संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, सेमी कंडक्टर या तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून संशोधन, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. संस्थेतील सहा संशोधन प्रकल्पांसाठी एकूण सुमारे सात कोटी ८४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. या प्रकल्पांमुळे सॅटेलाइट अँड ऑप्टिकल कम्युनिकेशन, डिजिटल फॉरेन्सिक्स, सेमी कंडक्टर डिझाइन, फाइव्ह-जी, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा प्रायव्हसी अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयआयआयटी पुणे संशोधनाला चालना देत आहे.
बी.टेक.च्या अंतिम वर्षात ६ ते १२ महिन्यांचे उद्योग क्षेत्रात कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ऑनर्समध्ये एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, व्हीएलएसआय डिझाइन यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशनची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे प्रा. नागेंद्र कुशवाह यांनी नमूद केले.
‘जेईई’द्वारे प्रवेश
आयआयआयटी, पुणे ही संस्था केंद्र सरकारद्वारे २०१६मध्ये स्थापन झालेली, राष्ट्रीय महत्त्वाची संस्था हा दर्जा असलेली अभियांत्रिकी, तंत्रज्ञान शिक्षण संस्था आहे. संस्थेतील पदवी अभ्यासक्रमांसाठी ‘जेईई’द्वारे प्रवेश दिले जातात. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान, सायबर सुरक्षा, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड व्हीएलएसआय डिझाइन असे अभ्यासक्रम संस्थेत राबवण्यात येत आहेत.
