पुणे : देशातील सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (आयआयआयटी, पुणे) येथे यंदापासून तीन नवे ‘बीटेक’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी ‘आयआयटी’तील प्राध्यापकांसह उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ अध्यापन करणार असून, या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत.

‘आयआयआयटी’, पुणेचे संचालक प्रा. विनीत कन्सल यांनी ही माहिती दिली. डॉ. जतीन मजीठिया, डॉ. नागेंद्र कुशवाह, डॉ. भूपेंद्र सिंह या वेळी उपस्थित होते. ‘अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी ‘आयआयटी मुंबई’, ‘आयआयटी कानपूर’ आणि ‘आयआयटी खरगपूर’ येथील प्राध्यापक नियमित मायक्रो-क्रेडिट अभ्यासक्रम शिकवणार आहेत. ‘आयबीएम इंडिया’चे तज्ज्ञ; तसेच अमेरिकेतील तज्ज्ञही या उपक्रमात सहभागी होणार असून, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ व्यावसायिकांनाही वर्गात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे,’ असे कन्सल यांनी नमूद केले.

संस्थेने ‘इस्रो’, ‘एएनआरएफ’ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या साह्याने सुमारे आठ कोटी रुपयांचे सहा संशोधन प्रकल्प सुरू आहेत. ‘आयआयटी मुंबई’बरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून, संशोधन, नवोपक्रम, उद्योग सहकार्य आणि विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ‘एम्स नागपूर’, ‘पीजीआयएमएस लखनऊ’ आणि ‘आयसीएमआर’ यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे कन्सल यांनी सांगितले.

नवे अभ्यासक्रम आणि जागा

बीटेक (सायबर सिक्युरिटी) : ६०

बीटेक (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स) : ९०

बीटेक (मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स अँड व्हीएलएसआय डिझाइन) : ६०

४५ लाखांचे सर्वोच्च पॅकेज

‘प्लेसमेंट प्रक्रियेत यंदा ‘आयआयआयटी, पुणे’मध्ये वार्षिक ४५ लाख रुपयांपर्यंतचे सर्वोच्च पॅकेज मिळाले. सरासरी पॅकेज १७.८८ लाख रुपये आहे. कार्यप्रशिक्षणासाठी (इंटर्नशिप) विद्यार्थ्यांना दरमहा दीड लाख रुपयांपर्यंतचे विद्यावेतन मिळाले असून, सरासरी विद्यावेतन ६० हजार रुपये आहे,’ अशी माहिती देण्यात आली.