लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: गेली काही वर्षे इमारत भाड्याने घेऊन कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे (आयआयआयटी पुणे) या संस्थेला राज्य सरकारने तळेगाव दाभाडेनजीक नानोली येथे शंभर एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत बांधकाम सुरू करण्यात आले असून, सध्याच्या नियोजनानुसार बांधकाम पूर्ण झाल्यास पुढील वर्षी नव्या संकुलात शैक्षणिक कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
आयआयआयटी पुणेचे कुलसचिव एच. एन. साहू यांनी यांनी ही माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. रीतू तिवारी, विभाग प्रमुख चंद्रकांत गुळेद, डॉ. संदीप मिश्रा, डॉ. वैदुर्या जैन, डॉ. तन्मय हाझरा, डॉ. वागिशा मिश्रा, प्लेसमेंट ऑफिसर मुदित सचदेवा या वेळी उपस्थित होते. सार्वजनिक, खासगी सहकार्य तत्त्वावर आयआयआयटी पुणे २०१६ पासून सुरू करण्यात आले. या संस्थेला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महत्त्वाची संस्था (नॅशनल इम्पॉर्टन्स) दर्जा देण्यात आला आहे. मात्र स्वत:ची जागा नसल्याने ही संस्था आतापर्यंत इमारत भाड्याने घेऊन कार्यरत आहे. आता तळेगाव दाभाडेनजीक नानोली येथे मिळालेल्या शंभर एकर जागेत शैक्षणिक इमारत, तीन वसतिगृहे, प्राध्यापक-कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.
आणखी वाचा-पुणे जिल्ह्यातील ८० शाळा शिक्षकांविना
साहू म्हणाले, की राज्य सरकारने नानोली गावातील शंभर एकर स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच केंद्र सरकारकडून १२८ कोटी रूपयांचा निधी बांधकामाच्या टप्प्यांनुसार मिळणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार जून २०२४ पर्यत शैक्षणिक संकुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
आयआयआयटी पुणेच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षणासोबतच मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षणासह कमी कालावधीचे श्रेयांक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच आयओटी, रोबोटिक्स आणि सुरक्षा, व्हीएलएसआय आणि सूक्ष्म तंत्रज्ञान, भारतीय भाषा आणि संगणकीय बुद्धिमत्ता या विषयांतील उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे डॉ. तिवारी यांनी सांगितले.
आणखी वाचा-अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘शरद पवार’ आणि ‘अजित पवार’ अशी दोन पक्ष कार्यालये!
प्लेसमेंटमध्ये वाढ
आयआयआयटी पुणेच्या प्लेसमेंटची टक्केवारी ९० टक्क्यांवर पोहोचली आहे. २०१९-२०मध्ये ६२ टक्के, २०२०-२१मध्ये ८७ टक्के, २०२१-२२मध्ये ९३ टक्के आणि २०२२-२३मध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यंदा सर्वाधिक ५३ लाख रुपयांचे एका विद्यार्थ्यांला मिळाले असून, सरासरी पॅकेज १६ लाख रूपये असल्याचे सचदेवा यांनी सांगितले.