पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या आयसर प्रवेश परीक्षेची (आयसर ॲडमिशन टेस्ट) व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. ही परीक्षा आता आयआयटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, आयआयईएसटी-शिवपूर या नामांकित संस्थांतील विशिष्ट पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठीही स्वीकारली जाणार आहे. यंदा ही परीक्षा ७ जून रोजी होणार आहे.
देशातील नामांकित शिक्षण आणि संशोधन संस्थांपैकी एक असलेली आयसर ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. आयसरच्या कोलकाता, तिरुअनंतपुरम, तिरुपती, पुणे, भोपाळ, मोहाली, बेहरामपूर येथे शाखा आहेत. आयसरच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाच वर्षीय बीएस-एमएस दुहेरी पदवी अभ्यासक्रम, विविध आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने आयसर कोलकाता येथील कम्प्युटेशन आणि विदा विज्ञान, आयसर मोहाली येथे भूविज्ञान आणि पर्यावरण विज्ञानातील नवे अभ्यासक्रम, आयसर भोपाळ आणि आयसर तिरुपती येथील चार वर्षे मुदतीचे बीएस आणि बी.टेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमातील वैविध्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधन-केंद्रित वातावरणात मुलभूत विज्ञान, विदा विज्ञान, अर्थशास्त्र, अर्थशास्त्र आणि अभियांत्रिकी अशा शाखांसह आंतरविद्याशाखीय अभ्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप-टेक यांसारख्या उदयोन्मुख, तंत्रज्ञानाधिष्ठित क्षेत्रात करिअर, संशोधनाचे पर्याय मिळणार आहेत.
‘आयसर’च्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश परीक्षेसाठीची अर्जप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना १३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षा ७ जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या प्रत्येक विषयासाठी बहुपर्यायी स्वरूपाचे १५ प्रश्न असतील. उमेदवारांना एकूण १८० मिनिटांचा वेळ मिळेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘आयसर’च्या प्रवेशासाठी ‘जेईई’चे गुण स्वीकारले जात होते. मात्र, अलीकडेच ‘आयसर’ने स्वतंत्र प्रवेश परीक्षा सुरू केली. यंदा ‘आयसर’ची प्रवेश परीक्षा अन्य शिक्षण संस्थांसाठीही ग्राह्य धरली जाणार आहे. अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती https://www.iiseradmission.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा
- अर्जासाठी अंतिम मुदत : १३ एप्रिल
- अर्जातील दुरुस्ती : १६ ते १८ एप्रिल
- परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध : २४ मे
- परीक्षा : ७ जून
