पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) वर्गांचे दरवाजे उद्योग क्षेत्रातील नोकरदारांसाठीही खुले करण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्राकडून आलेल्या मागणीमुळे आयसरमधील काही विशिष्ट विषयांसाठी नोकरदारांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक वर्गातील ५ ते १० टक्के जागांवर नोकरदारांना संधी मिळणार आहे.
आयसरच्या स्थापनेला २० वर्षे झाल्यानिमित्ताने आयसर पुणेचे संचालक डॉ. सुनील भागवत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. आयसर पुणेचे मानद सदस्य आणि आयसर कोलकाताच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांच्यासह संशोधन आणि विकास अधिष्ठाता प्रा. आर भूमी शंकर, प्रा. एस. जी. श्रीवत्सन, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. स्रंबती चौधुरी, योजना अधिष्ठाता प्रा. सुरजीत सिंह, विद्यार्थी आणि संकुल अधिष्ठाता डॉ. चंद्रशील भागवत, प्रा. सुतीर्थ डे, कुलसचिव उमेशकुमार मोते या वेळी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, ‘आयसर पुणेतील एमएस्सी आणि पीएचडी शिक्षणापेक्षा खूप वेगळे असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगण्यात आले. तसेच माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, रासायनिक क्षेत्रातील उद्योगांकडून काही विशिष्ट अभ्यासक्रमांतील विषयांना नोकरदारांना प्रवेश देण्याची मागणीही करण्यात आली. त्याबाबत विचार करून नोकरदारांना विशिष्ट विषयांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम दोन्ही बाजूंनी फायदेशीर ठरेल. उद्योगातील नोकरदारांना आयसरमध्ये सुरू असलेले प्रगत संशोधन प्रत्यक्ष पाहता येईल, तर विद्यार्थ्यांना नोकरी करतानाही लोक शिकतात हे पाहून शिक्षणाचे महत्त्व समजू शकेल. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्गातील शिक्षणाकडील लक्ष टिकून राहावे या दृष्टीनेही प्रयत्न आहे.
‘नोकरदारांना प्रवेश देताना पूर्ण पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही, तर काही विशिष्ट विषयांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे नोकरदार त्या विषयांच्या व्याख्यांनासाठी वर्गात उपस्थित राहू शकतील. प्रवेश दिल्या जाणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण प्रत्येक वर्गात ५ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. संबंधित विषयांचे शिक्षण घेऊन त्यांची परीक्षा घेतली जाईल. त्यांचे श्रेयांक ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये साठवले जातील. नोकरदारांकडून नियमित विद्यार्थ्यांपेक्षा थोडे जास्त शुल्क आकारले जाईल. प्रवेशासाठी किमान पात्रता म्हणून विज्ञान, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी आवश्यक असेल,’ असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
आयसर पुणेमध्ये बऱ्याच काळापासून उद्योग क्षेत्राकडून पुरस्कृत पीएच. डी. अभ्यासक्रमही राबवला जात आहे. त्या अंतर्गत उद्योगांतील कार्यरत कर्मचारी आयसरमधील मार्गदर्शकांसोबत नोंदणी करून काही काळ संस्थेत आणि काही काळ उद्योगात संशोधन करतात. या कार्यक्रमांतर्गत एक पीएच. डी. पूर्ण झाली असून, सहा जणांचे संशोधन सुरू असल्याचेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
५२ एकस्व अधिकार प्राप्त
आयसर पुणेची २००६मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत सुमारे २७०० विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. संस्थेत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पृथ्वी व हवामानशास्त्र, मानव्य विद्या व सामाजिक विज्ञान, विदा विज्ञान, विज्ञान शिक्षण असे आठ विभाग आहेत. केंद्र सरकारकडून ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ हा दर्जा मिळालेल्या या संस्थेने मूलभूत संशोधन आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणावर भर दिला आहे. पाच वर्षांचा बीएस-एमएस हा एकात्मिक अभ्यासक्रम, पीएच.डी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. आतापर्यंत संस्थेतून एकस्व अधिकारांसाठी एकूण १४८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर ५२ एकस्व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यातील काहींचे व्यावसायिकीकरण झाले आहे.
