पुणे : महासाथीसारख्या आव्हानात्मक काळात केंद्रीय पुरवठा साखळीवरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी पाच देशांतील संशोधकांनी एकत्र येऊन महत्त्वपूर्ण उपाय शोधला आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधने, माहितीचा वापर करून, एकमेकांना न भेटताही उच्च दर्जाचे वैद्यकीय घटकांची निर्मिती करणे शक्य असल्याचे अनोख्या संशोधन प्रकल्पातून दाखवून दिले आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर पुणे) या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या फार्मास्युटिकल सायन्सेस विभागातील प्रा. कीथ पार्डी यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात आयसर पुणेतील जीवशास्त्र विभागातील प्रा. चैतन्य आठले, डॉ. तन्वी काळे यांचा सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध अमेरिकन अकॅडमी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. करोना महासाथीच्या काळात केंद्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. त्यामुळे शास्त्रज्ञ विकसित करत असलेली वैद्यकीय उपकरणे, आरएनए लसी, निदान साहित्य पोहोचण्यास विलंब झाला.

परिणामी, अनेक ठिकाणी नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया आणि भारत या पाच देशांतील शास्त्रज्ञांच्या गटाने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे साहित्य-संसाधने, माहितीची देवाणघेवाण यांच्या आधारे उच्च दर्जाच्या वैद्यकीय घटकांची निर्मिती करण्याबाबत संशोधन केले. या संशोधन प्रकल्पासाठी ‘कॅनेडियन डेव्हलपमेंट फंड,’ ‘शास्त्री इंडो-कॅनेडियन इन्स्टिट्यूट’ यांनी निधी उपलब्ध करून दिला होता.

संशोधनाअंतर्गत शास्त्रज्ञांनी पेशीविरहित प्रणाली (सेल फ्री सिस्टिम्स), कृत्रिम जीवशास्त्र (सिंथेटिस बायोलॉजी) तंत्रज्ञानाचा वापर करून अण्विक निदान (मॉलेक्युलर डायग्नोस्टिक्स, उदाहरणार्थ लॅम्प, टोहोल्ड आरएनए चाचण्या), पेप्टाइड-आधारित लसींसाठी लागणारी उच्च दर्जाचे प्रथिने प्रयोगशाळेत यशस्वीरित्या तयार केली. चिलीतून पाठवलेले पेशी अर्क (सेल-फ्री एक्स्ट्रॅक्ट) इतर देशांतील प्रयोगशाळांमध्ये स्थानिक उपकरणांच्या सहाय्याने तंतोतंत, दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करण्यात आले. आयसर पुणेतील प्रा. चैतन्य आठले यांच्या प्रयोगशाळेत कृत्रिम डीएनए संरचनांचा (सिंथेटिक डीएनए कॉन्स्ट्रक्ट्स) वापर करून प्रथिनांची निर्मिती करून या प्रक्रियेची चाचणीही घेतली. याच संशोधनामध्ये ‘टोहोल्ड आरएनए’ तंत्रज्ञानावर आधारित कागदी चाचणी संच विकसित केला. हा चाचणी संच पारंपरिक पीसीआर चाचणीला स्वस्त, सुलभ पर्याय ठरू शकतो. तसेच कॅनडातील संशोधकांनी करोना विषाणूचे ‘स्पाइक प्रोटीन’ तयार करून त्याची उंदरांवर लस म्हणून यशस्वी चाचणीही केली. या प्रकल्पातील संशोधन साहित्याची देवाणघेवाण टपालाद्वारे करण्यात आली, अशी माहिती ‘आयसर पुणे’ने दिली.

भविष्यात करोना महासाथीसारखे जागतिक संकट आल्यास शासन, धोरणकर्त्यांना स्थानिक पातळीवर उपाय शोधण्यासाठी हे संशोधन मार्गदर्शक ठरेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील अनेक शास्त्रज्ञ एकमेकांना कधीही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. केवळ सामाजिक जबाबदारीची भावना, सहकार्यातून हे संशोधन शक्य झाले.- प्रा. चैतन्य आठले, आयसर पुणे