पुणे : पुण्याच्या परिसरातील सूस परिसरातील टेकडीवर शास्त्रज्ञांनी नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. पांढरे फुल येणाऱ्या या वनस्पतीचे ‘कॅन्स्कोरा अग्नी’ असे नामकरण करण्यात आले असून, वारंवार लागणाऱ्या आगीशी जुळवून घेत ही वनस्पती विकसित झाली आहे. तसेच, गवताळ प्रदेशात लागणारी आग ही केवळ घातक नसून, जैवविविधतेसाठी आवश्यक असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले.
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), सवाना सायन्स फाऊंडेशन, नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालय यांनी या बाबतचे संशोधन केले. आयसर पुणेतील डॉ. आशिष नेर्लेकर, डॉ. शरद सुरेश कांबळे यांचा या संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.
गवताळ प्रदेशातील वनस्पतींच्या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना ही लहान वनस्पती सूस टेकडीवर आढळली. सुरुवातीला ही वनस्पती ‘कॅन्स्कोरा अलाटा’ या ज्ञात प्रजातीसारखी वाटत होती. मात्र, दशकभरातील क्षेत्रीय निरीक्षणे, ऐतिहासिक वनस्पती नोंदी, जागतिक वर्गीकरण, तसेच ‘कॅन्स्कोरा अलाटा’च्या मूळ नमुन्यांशी केलेल्या तुलनात्मक अभ्यासानंतर ही पूर्णपणे नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये ‘अग्नी’ म्हणजे आग. भारतीय गवताळ परिसंस्थेत नैसर्गिकरीत्या किंवा मानवाने आग लावणे विनाशकारी नसून, त्या जैवविविधता टिकवून ठेवण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, हा संदेश देण्यासाठी या वनस्पतीला ‘अग्नी’ हे नाव दिले, अशी माहिती संशोधकांनी दिली.
वनस्पतीचे शास्त्रीय विश्लेषण केल्यानंतर ही वनस्पती दर एक ते पाच वर्षांनी आग लागणाऱ्या गवताळ प्रदेशात टिकून राहत असल्याचे निदर्शनास आले. आग रोखण्यात आलेल्या भागात किंवा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेल्या भागात ही वनस्पती आढळली नाही. भारतीय गवताळ परिसंस्थेतील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आगी जैवविविधतेसाठी आवश्यक असल्याचे असल्याचे संशोधकांनी अधोरेखित केले.
वनस्पतीची वैशिष्ट्ये
‘कॅन्स्कोरा अग्नी’ ही वनस्पती तिच्या कुळातील अन्य वनस्पतींपेक्षा वेगळी आहे. ही वनस्पती केवळ १० सेंटिमीटर उंचीपर्यंत वाढते. तिला पाने कमी, लहान असतात. फुलांच्या देठावरील पंखासारख्या कडा असमान रुंदीच्या असून, फुलाजवळ रुंद आणि खोडाकडे निमुळत्या होत जातात. फुलाच्या तळभागावरील जाळीसारख्या शिरा, चार पाकळ्या असलेले पांढरे फूल, सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येणे, अशी या वनस्पतीची वैशिष्ट्ये आहेत.
मानव हजारो वर्षांपासून भारतातील गवताळ प्रदेशात आग लावत आला आहे आणि त्यातून तो निसर्गाला आकार देत आला आहे, ही बाब मान्य करण्यात काहीच वावगे नाही. त्याचा वनस्पतींना फायदाच झाला आहे. गवताळ प्रदेशात लागणाऱ्या आगींमध्ये नैसर्गिकरीत्या आग लागण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे नव्या वनस्पतीला दिलेल्या ‘अग्नी’ या नावामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये योग्य ती माहिती पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तसेच, गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. – डॉ. आशिष नेर्लेकर, शास्त्रज्ञ, आयसर पुणे
