पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) ‘कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड’ (सी-आर्ट) हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाद्वारे देशाच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशातील हवामानाचा व्यापक स्तरावर अभ्यास करण्यात येणार असून चक्रीवादळे, पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा तीव्र हवामान घडामोडींसाठी पूर्वसूचना प्रणाली सक्षम केली जाणार आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड’ या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. विशाखापट्टणमचे भौगोलिक स्थान बंगालच्या उपसागरालगत आहे. तसेच विशाखापट्टणम हे देशातील महत्त्वाचे बंदर आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. मात्र, या किनारपट्टी भागाला चक्रीवादळे, पाऊस, वादळी वारे आणि उष्णतेच्या लाटा अशा तीव्र हवामान घटनांचा वारंवार फटका बसतो. या पार्श्वभूमीवर, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘मिशन मौसम’ योजनेअंतर्गत सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड या प्रकल्पासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि प्रणाली आंध्र विद्यापीठाच्या हवामानशास्त्र आणि सागरी विज्ञान विभागात अत्याधुनिक उपकरणांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आयआयटीएम, आंध्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

‘कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सीलोमीटर, एरोसोल मास स्पेक्टोमेट्री, क्लाउड कन्डेन्सेशन न्यूक्लिआय काऊंटर, डिस्ट्रोमीटर अशी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी आंध्र विद्यापीठाने जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच काही उपकरणे विशाखापट्टणममधील भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि इतर संस्थांमध्येही बसवण्यात आली आहेत. पुढील टप्प्यात रडार, रिमोट सेन्सिंग साधनेही उपलब्ध केली जाणार आहेत. या माध्यमातून ढगनिर्मिती, प्रदूषण-हवामान, सूक्ष्म पर्जन्य रचनेची तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे. दीर्घकालीन असलेल्या या प्रकल्पामुळे ‘सी-आर्ट’ हे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र म्हणून काम करणार आहे.

किनारी प्रदेशातील हवामान अंदाजाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. मात्र, सी-आर्ट प्रकल्पाद्वारे अत्याधुनिक प्रणालींच्या साहाय्याने वातावरणातील सूक्ष्म कण (एरोसोल), ढगांची रचना, पर्जन्य प्रक्रिया आणि हरितगृह वायूंचे प्रमाण यांचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल. या अभ्यासातून व्यापक विदा उपलब्ध होणार असल्याने या विदाचा वापर हवामान प्रारुपांमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळांची निर्मिती आणि तीव्रता यांचा अधिक विश्वासार्ह अंदाज देता येऊ शकेल. तसेच सागरी उष्णतेच्या लाटांचाही अभ्यास केला जाणार आहे. – डॉ. बी. पद्माकुमारी, सी-आर्ट प्रकल्प संचालक, आयआयटीएम