पुणे: स्वीडनची घरगुती फर्निचर कंपनी आयकिया आता पुणेकरांच्या भेटीला आली आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूनंतर कंपनीने पुण्यात मोठे पाऊल टाकले आहे. आयकियाचे पुण्यातील पहिले दालन १२ मार्चपासून विमान नगरमधील फिनिक्स मॉलमध्ये सुरू होत आहे. या नवीन दालनामुळे पुणेकरांना आता आयकियाची फर्निचर उत्पादने आणि घराच्या सजावटीचे नवनवीन पर्याय अनुभवता येतील.

आयकियाचे पुण्यातील दालन सुमारे ३२ हजार चौरस फुटांचे आहे. या दालनात ग्राहकांना आपल्या घरासाठी आवश्यक वस्तू सहजपणे पाहता येईल. फर्निचर प्रत्यक्षात पाहता येत असल्याने त्याची खरेदी करणेही ग्राहकांसाठी आता सोयीचे होणार आहे. पुणे शहरातील घरगुती सजावटीच्या गरजा लक्षात घेत या दालनात १ हजार ९०० उत्पादने पाहता येईल. त्यापैकी १ हजार ७०० उत्पादनांची खरेदी दालनात करता येईल तर ग्राहक ४ हजार ५०० वस्तूंची नोंदणी करून ती घरपोच मिळवू शकतात. हे दालन १२ मार्चपासून ग्राहकांसाठी खुले होत आहे.

आपल्या घरात सजावटीसाठी कोणत्या वस्तू खरेदी योग्य राहील, याची पुणेकरांना माहिती मिळावी म्हणून दालनामध्ये पुणेरी घरांच्या रचनेनुसार खोल्यांची मांडणी करण्यात आली आहेत. ग्राहक डिजिटल पर्यायांचा वापर करूनही स्वतःच्या घरातील आवश्यक वस्तूंच्या खरेदीचे नियोजन करू शकतात. दालनामध्ये इंटिरिअर प्लॅनिंग तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल. आयकियाच्या दालनामध्ये स्वीडिश कॅफे असून, तिथे स्वीडनमधील लोकप्रिय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास

गेल्या सहा वर्षांपासून आयकियाची उत्पादने ऑनलाइन माध्यमातून पुणेकरांसाठी उपलब्ध आहेत. या काळात आयकियाने ४ लाख ग्राहकांना सेवा दिली असून, पुण्यातील जीवनशैलीचा जवळून अभ्यास केला. पुण्यातील ग्राहकांच्या गरजा, सवयी आणि घरातील आवश्यक वस्तू या घटकांवरही आयकियाने भर दिला आहे. पुणेकर स्मार्ट आणि बहुपयोगी फर्निचर निवडतात. डोळ्यांना सुखावणाऱ्या मातकट रंगाचे, पर्यावरणपूरक डिझाइन्सना पुणेकरांची पसंती आहे. पुणेकरांच्या या आवडीनिवडी त्यांच्या व्यवहारिक, विचारशील आणि किफायतशील जीवनशैलीचे दर्शन घडवतात. पुणेकरांच्या सर्व गरजा लक्षात घेऊनच नव्या दालनाची उभारणी करण्यात आली आहे.

पुणेकर व्यावहारिक

पुण्याच्या जीवनशैलीतून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुणेकर व्यावहारिक आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाचे आहेत. ते शाश्वत जीवनशैलीबद्दल अधिकाधिक जागरूक आहेत. आम्ही या नव्या दालनाच्या माध्यमातून पुणेकरांचे दैनंदिन जीवन अधिक चांगले बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

  • पॅट्रिक अँटोनी, मुख्याधिकारी, आयकिया इंडिया