पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात करोना काळात टाळेबंदी असताना गेल्या अडीच वर्षात तब्बल ३६१४ बेकायदा बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. पीएमआरडीएकडून बेकायदा बांधकामांबाबत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आव्हान पीएमआरडीएसमोर आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण, कारवाई केलेले आणि गुन्हे दाखल केलेल्या बेकायदा बांधकामांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये करोना काळात म्हणजेच २०२० पासून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत.

पीएमआरडीए क्षेत्रात गेल्या सात वर्षांत तब्बल साडेसात हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत. यातील करोना काळात ३६१४ बेकायदा बांधकामे झालेली आहेत.दरम्यान, राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयम २००१ मध्ये अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार पीएमआरडीएने आपल्या कार्यक्षेत्रातील गुंठेवारीत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहेत. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करायचे असून अनधिकृत बांधकामधारकांना यासाठी सातबारा उतारा, स्थापत्यरचना अभियंत्यांकडून (स्ट्रक्चरल इंजिनिअर) स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) तसेच ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे बांधकाम असल्याबाबतचा गुगल नकाशा आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. त्याकरिता आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी अत्यल्प म्हणजेच ३४ अर्ज सप्टेंबरपर्यंत आले आहेत.

हेही वाचा : चांदणी चौक पूल : बांधण्याचा खर्च २५ लाख; पाडण्याचा खर्च दीड कोटी!

पीएमआरडीए क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचा आढावा

कालावधी- बेकायदा बांधकामे-कारवाई- गुन्हे दाखल व्यक्ती-क्षेत्रफळ (चौ.फूट)

२०१५-१८ १२१३             ६५            शून्य             ७५,९९८

२०१९            २८०४             ५६            शून्य             २,९६,९७९

२०२०            १६८७             १९             ५९             ४२,२६९

२०२१            १३४२             ३६             १७             १,४७,२२६

२०२२            ५८५             ५४             १८             ३,१८,६३३

एकूण            ७६३१             २६३            ९४             १०,५२,७२६