पुणे : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुण्यातील लोहगाव भागातील एका डाॅक्टरसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या प्रकरणी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लोहगाव भागात राहणाऱ्या एका डाॅक्टरसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या डाॅक्टरसह साथीदारांविरुद्ध गर्भधारणापूर्व, तसेच प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसंकडून पथके तयार करण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख या वेळी उपस्थित होते.

यवत पोलीस ठाण्यातील पथकाने केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात एकाला अटक केली होती. या बाबत एका डाॅक्टरांनी फिर्याद दिली होती. १७ मे रोजी त्यांना बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याबाबतची चित्रफीत एका महिलेने पाठविली होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपी अण्णासाहेब गिरी याने एकाकडून गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरले जाणारे यंत्र (सोनोग्राफी मशीन) घेतल्याचे निष्पन्न झाले होते. गिरी याला अटक केल्यानंतर लोहगावमधील डाॅक्टरसह चौघांची नावे निष्पन्न झाली.

या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाइल संच तांत्रिक तपास, तसेच अन्य पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पथकाने ही कामगिरी केली.

शेकडो महिलांची तपासणी; चाचणीसाठी ५० हजार रुपये

बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात अटक केलेला आरोपी गिरी हा बारावी उत्तीर्ण आहे. त्याने एका डाॅक्टरांच्या हाताखाली काही काळ काम केले होते. गिरीने बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केल्याचे तपासात उघडकीस आले. गिरी हा पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करत होता. महिलांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन चाचणीसाठी ४० ते ६० हजार रुपये घेत होता. आरोपीने गेल्या पाच वर्षांत शेकडो महिलांची तपासणी केल्याची माहिती मिळाली असून, त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी हा दहा ते पंधरा डाॅक्टरांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक