पिंपरी : ‘निगडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत, बक्षीसपत्र व करारनामे या दस्तामधून मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षा कमी प्रमाणात मुद्रांक शुल्क, नोंदणी फी भरून ५५ दस्तांची बेकायदा नोंदणी झाली आहे. त्यातून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कापोटी तीन कोटी १९ लाख ६४ हजार रुपयांचे शुल्क बुडाले आहे,’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
निगडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदा दस्तनोंदणी झाली आहे. याबाबत सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयाच्या तपासणीत ५५ दस्तांमध्ये तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक आणि नोंदणी शुल्क बुडविले असल्याबाबतचा तारांकित प्रश्न चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विचारला होता. त्यास महसूलमंत्री बावनकुळे यांनी लेखी उत्तर दिले.
‘निगडीतील खरेदी खत, बक्षीस पत्र व करारनामे या दस्तांमधून मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षा कमी प्रमाणात मुद्रांक शुल्क, नोंदणी फी भरून दस्तनोंदणी केल्याचे खरे आहे. या कार्यालयातील दस्तांची विशेष पथकाने तपासणी केली आहे. त्यात आक्षेपित ५५ दस्तांपैकी १२ दस्तांमध्ये इतर अनियमितता झाली आहे. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून ३४ दस्त नोंदविले आहेत. नऊ दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क व नोंदणी फी कमी आकारली आहे. मुद्रांक शुल्काचे तीन कोटी १८ लाख ४१ हजार आणि नोंदणी शुल्क एक लाख १३ हजार असे तीन कोटी १९ लाख ६४ हजार रुपयांचे शुल्क बुडविल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक आर. एन. दोंदे यांना ६ जून २०२५ रोजी निलंबित करण्यात आले,’ अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.