डॉक्टरांना ठोठावण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेवर मर्यादा हवी – आयएमएची मागणी

वैद्यकीय खटल्यात डॉक्टरला दंड झाल्यास त्याला रुग्णाला द्याव्या लागणारी रक्कम एक कोटी रुपयांहून अधिक असू नये, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

वैद्यकीय खटल्यात डॉक्टरला दंड झाल्यास त्याला रुग्णाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईच्या रकमेवर मर्यादा असणे आवश्यक असून ही रक्कम एक कोटी रुपयांहून अधिक असू नये, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. आयएमएच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या निमित्ताने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सारडा यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे, सचिव डॉ. प्रकाश मराठे, डॉ. अरूण हळबे या वेळी उपस्थित होते.
वैद्यकीय आस्थापना कायद्यात आवश्यक सुधारणा केल्याशिवाय तो राज्यात राबवला जाऊ नये, तसेच वैद्यकीय खटले ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत न चालवता त्यासाठी जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवर वैद्यकीय लवादांची निर्मिती केली जावी, या प्रमुख मागण्या या वर्षी आयएमएतर्फे लावून धरण्यात येणार असल्याचे डॉ. सारडा यांनी सांगितले.
डॉ. सारडा म्हणाले, ‘‘वैद्यकीय आस्थापना कायद्यातील सुधारणांबद्दल आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांना पत्र देण्यात आले असून हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. बोगस डॉक्टरांना तसेच ‘क्रॉस प्रॅक्टिस’ला आयएमएचा विरोध आहे. बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या ‘अँटी क्व्ॉकरी कायद्या’साठीही राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. केंद्राने ‘बॅचलर ऑफ रूरल मेडिसिन अँड सर्जरी’ (बीआरएमएस) या अभ्यासक्रमाचे रुपांतर ‘बीएस्सी- कम्युनिटी हेल्थ’ या अभ्यासक्रमात केले आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या व्यक्तींना ‘पॅरा मेडिकल काऊन्सिल’कडे नोंदणी करणे बंधनकारक करावे अशी आमची भूमिका आहे.’’
रुग्णालय व डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर असून त्याबद्दल रुग्णालय सुरक्षा कायद्यात असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे डॉ. सारडा यांनी सांगितले. याबद्दल पोलीस आयुक्तांमार्फत सर्व पोलीस ठाण्यांना पत्रे देणार असल्याचे ते म्हणाले.  

डॉक्टरांच्या आरोग्यासाठी सायकल प्रतिष्ठान
डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ‘पुणे सायकल प्रतिष्ठान’च्या धर्तीवर राज्यातील आयएमएच्या २०० शाखांमध्ये सायकल प्रतिष्ठान सुरू करण्याचा आपला मनोदय असल्याचे डॉ. सारडा यांनी सांगितले. यातील चंद्रपूर सायकल प्रतिष्ठानची सुरूवात मंगळवारी करण्यात आल्याचे ते म्हणाले. याबरोबरच प्रत्येक शाखेने एक गाव दत्तक घेऊन तेथे वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, असेही आयएमएचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ima demands to control penaulty upto 1 cr for guilty doctors

ताज्या बातम्या