लोणावळ्यात ढोल ताशांचा गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. साडेसात तासांनी मिरवणुकीची सांगता झाली. विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली.लोणावळ्यात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश मंडळाच्या मिरवणुकीस मावळा चौकातून प्रारंभ झाला. त्यामागोमाग मानाचा दुसरा तरुण मराठा मंडळ, गावठाण, मानाचा तिसरा रोहिदास तरुण मंडळ, मानाचा चौथा गवळीवाडा, मानाचा पाचवा शेतकरी भजनी मंडळ, वळवण, मानचा सहावा राणाप्रताप नेताजी मित्र मंडळाचे गणपती होते. मानाच्या मंडळासह विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या समोर ढोल ताशा पथकांनी वादन सादर केले. लोणावळा नगरपरिषद, शहर पोलीस ठाणे, गणराया पुरस्कार समिती, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, सत्यनारायण समितीकडून मंडळांचे स्वागत करुन पुष्पवृष्टीकरण्यात आली. सत्यानंदन तीर्थधाम आश्रमाकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रामदेव बाबा भक्त मंडळ, लायन्स क्लबकडून भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा >> पुणे : अनंत चतुर्थीदिवशी ३ लाखाहून अधिक मूर्तींचे विसर्जन ; ४ लाख ४३ हजार किलो निर्माल्याचे संकलन

मध्यरात्री दीडच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशासक पंडीत पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले. लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.