पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर १९९९ पासून ते आतापर्यंत सुमारे १७ वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच जिल्ह्यावर एकाहाती नेतृत्व राहिले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अजित पवार यांच्या आदेशानेच काम करत असल्याने ‘जिल्ह्याचा नेता’ म्हणून नवे स्वतंत्र नेतृत्व उदयास आले नाही. सर्वच नेते हे आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहून अजित पवार यांच्या सावलीखाली काम करत राहिले. आता या नेत्यांवरील सावलीच गेल्याने ते ‘पालका’च्या शोधात आहेत.

अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे नेतृत्व हे पालकमंत्री या नात्याने १९९९ पासून हाती घेतले. त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपर्यात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे घट्ट केली. जिल्हा परिषद, महापालिका, सहकारी संस्था या प्रत्येक ठिकाणी अजित पवार यांचा शब्द अंतिम राहिला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी अजित पवार हे कायम ‘पालक’ राहिले.

गेल्या २५ वर्षांत पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तयार झाले. मात्र ते अजित पवार यांच्या सावलीतच वाढले. अजित पवार हाच त्यांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याने स्वतंत्र नेतृत्व उदयास आले नाही. अजित पवार हे त्यांच्या दृष्टीने ‘पालका’च्या भूमिकेत असायचे. मतदारसंघातील पेचप्रसंग असो किंवा विकासकाम, त्यातून मार्ग काढण्यासाठी अजित पवार हे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आधार असायचे. त्यामुळे या नेत्यांमध्ये अस्वस्थता असून, ते ‘पालका’च्या शोधात आहेत.

जिल्ह्याचा ग्रामीण भाग, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या ठिकाणी अजित पवार यांचा पुण्यातील नेते ‘पालका’च्या शोधात दबदबा कायम राहिला. या प्रत्येक ठिकाणी त्यांचे विश्वासू साथीदार असायचे. ते आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहिले. प्रामुख्याने पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा त्यांचे प्राबल्य असलेला होता.

या भागात आंबेगाव विधानसभा मतदारसंंघाचे आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, इंदापूरचे आमदार, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, वडगाव मावळचे आमदार सुनील शेळके, शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोरचे आमदार शंकर मांडेकर हे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे पुणे जिल्ह्यातील आमदार आहेत. त्यापैकी कटके आणि मांंडेकर हे गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळे पहिल्यांदाच निवडून आले. सुनील शेळके हे अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे आक्रमकपणे काम करत आले. जिल्ह्यात वळसे पाटील आणि भरणे हे दोघे अजित पवार यांचे अनुभवी साथीदार राहिले. त्यांपैकी भरणे यांच्यावर अजित पवार हे कायम महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवत आले.

पुणे शहरामध्ये माजी आमदार सुनील टिंगरे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविली. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना अजित पवार यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यातून या शहरात नवीन नेतृत्व तयार झाले.

मात्र गेल्या महापालिका निवडणुकीत अनेकांनी त्यांची साथ सोडून भाजपची वाट धरली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या सान्निध्यात राहून राजकारणाचे धडे गिरवले. कालांतराने ते भाजपमध्ये गेले. मात्र त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांचा दबदबा कायम राहिला.

प्रशासनाचेही ‘पालक’

प्रशासकीय कामकाजाची बारकाईने माहिती असलेले अजित पवार हे प्रशासनातील काही अधिकार्यांसाठी ‘पालका’च्या भूमिकेत राहिले. करोनाच्या काळात ते पालकमंत्री म्हणून सलग चार-पाच तास बैठक घेऊन अधिकार्यांना सूचना द्यायचे. प्रशासकीय पेच निर्माण झाल्यास अनुभवाच्या जोरावर ते अधिकार्यांपुढील प्रश्न सोडवायचे. त्या अर्थाने ते प्रशासनाचेही ‘पालक’ असल्याचे बोलले जाते.

पालकमंत्री कोण?

  • अजित पवार हे १९९९ मध्ये पहिल्यांदा पुण्याचे पालकमंत्री झाले. २०१४ ते २०१९ या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात आणि २०२२ ते २०२३ हा महायुती सरकारचा काळ वगळता ते शेवटपर्यंत पुण्याचे पालकमंत्री होते.
  • आता पुण्याचे पालकत्व कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधिमंडळ नेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यास या पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे- पाटील, दत्तात्रय भरणे यांच्याकडेही या पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.