आपण सांस्कृतिकमंत्री असताना राज्यात प्रथमच सांस्कृतिक धोरण राबविण्याचा प्रस्ताव संमत केला, पण दुर्दैवाने त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही, अशी कबुली सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. सांस्कृतिक विभागाच्या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालणार असून सांस्कृतिकमंत्री संजय देवताळे यांच्याबरोबर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे चित्रपट व्यावसायिक कृती समितीतर्फे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष विजय कोंडके आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे, कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात ‘साहित्य आणि चित्रपट : एक अनुबंध’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, अभिनेत्री अलका कुबल, स्मिता तांबे, मिलिंद लेले, सुभाष भुरके, प्रसाद मिरासदार यांनी सहभाग घेतला.  
महामंडळाची सध्याची परिस्थिती सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सर्वाना एकत्रित घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असे विजय कोंडके यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये फक्त कुंपणावर खर्च न करता सरकारने चित्रीकरणासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सेटची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मराठी चित्रपटाच्या अनुदानात वाढ करण्याबरोबरच डिजिटल चित्रपटाच्या अनुदानासह कोल्हापूर चित्रनगरीचा प्रश्न सरकारने त्वरित सोडवावा, अशी मागणी मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविकामध्ये केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. संजय ठुबे यांनी आभार मानले.