माती ही जननी आहे. जे बीज मातीत पडेल ते अंकुरणार अन् मातीतून पोषक द्रव्ये शोषणार, पाणी शोषणार, तरारणार, फुलणार अन् फळणार. आपण लावलेलं बीज अंकुरताना पाहणं यासारखा आनंद नाही. पण जर हे बीज आपण लावलं नसेल तर.. तर हे तण असतं. कुंडय़ांमध्ये वाफ्यामध्ये आपण लावलेल्या वनस्पतीव्यतिरिक्त जे अनाहूतपणे उगवते ते तण. तणामुळे आपण लावलेल्या वनस्पतींच्या अन्नपुरवठय़ामध्ये भागीदार निर्माण होतात आणि बागेच्या सौंदर्यास तणाच्या बेसुमार वाढण्याने बाधा येते. त्यामुळे तणाचे व्यवस्थापन गरजेचे असते.

तणामध्ये गवताचे प्रकार, एकदलीय, द्विदलीय तणे असे असतात. स्थानिक वनस्पती असतात, तर काही परदेशी. आपल्या बागेत नेहमी आढळणारे तण केनी, हरळी, घोळ, आंबोशी, राजगिरा, माठ, सटायव्हा, नागरमोथा, भुईआवळा, एकदांडी असे अनेक प्रकारचे आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

जमिनीचा कस कमी झाला व त्यातील सेंद्रिय कर्ब कमी झाला की तण माजतात. त्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ वा सेंद्रिय मातीची भर घालणे गरजेचे असते. पालापाचोळा, भुसा, कोकोपीथ यामध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर असते.

जमिनीत खूप पाणी मुरल्यास जमीन घट्ट होते व तण वाढू लागते. जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी सेंद्रिय मातीचा उपयोग होतो व या मोकळ्या मातीमुळे तण उपटणे सहज शक्य होते.

छोटय़ा कुंडय़ांमध्ये झाडे असल्यास वेळोवेळी खुरपणी केल्यास तणाचा त्रास होत नाही. वाफयांमध्ये भाजीपाला लावण्यास मुख्य भाजीची उगवण झाल्यावर सुरुवातीलाच खुरपणी करावी. तणाची छोटी रोपं काढून मातीत कुजण्यास टाकावीत. यामुळे नत्र मिळेल. यास बाळ कोळपणी म्हणतात. भाजीपाल्याची रोपं वाफ्यात व ड्रममध्ये लावल्यास त्याच्या आजूबाजूने वर्तमानपत्राचे आच्छादन करावे; ज्यामुळे जमिनीस सूर्यप्रकाश मिळणार नाही व तण उगवणार नाही. हा सोप्या बीन खर्चाचा उपाय पुढील श्रम वाचवतो.

बाळ कोळपणी करायला वेळ झाला नाही तर तण झपाटय़ाने वाढतात, त्यास फुलं येऊन बी धरते, जे वाऱ्यावर उडून इतस्तत: पसरते व रुजते. त्यामुळे तण काढून बादलीत घालावेत. ते बुडतील इतके पाणी बादलीत भरावे, चार-पाच दिवसांनी तण कुजतील. हे पाणी ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून झाडांना द्यावे. कुजलेले तण गांडुळांना खायला द्यावेत. या पद्धतीमुळे बीजप्रसार होऊन तण उगवण्याचे प्रमाण कमी होते. स्थानिक वनस्पतीची विविधता निसर्गातील किडींचे, जमिनीच्या कसाचे संतुलन राखते, पण आपल्याला आपण निवडलेल्या वनस्पती हव्या असतात व मूळच्या वनस्पती ‘तण’ वाटतात. या तणांचा उपयोग करून मातीतील पोषक द्रव्यांचे चक्र सांभाळता येते. तणांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये असतात. जमिनीचा कस वाढल्यास हरळी,नागरमोथा हे आक्रमक तण येण्याचे प्रमाण कमी होते. तणांची ओळख करून घेतल्यास अनेक भाज्या मिळू शकतात.

गुलाबी काडय़ांचा, नाजूक पानांचा घोळ व एक जाडसर पानांचा पिवळ्या फुलांचा घोळ (पोर्टलाक्क) असतो. कांदा, लसूण, मिरची घालून याची भाजी छान होते. आंबुस असल्याने गूळ घालून ही भाजी छान होते. याच्या फुलांवर मधमाश्या आकर्षित होतात व आपल्या बागेला फायदा होतो.

राजगिरा, माठ, चंदनबटवाची पालेभाजी छान होते. कोवळी डेरू खुडली तर बी धरत नाही व परत उगवण्याचे प्रमाण कमी होते. केनीच्या पानांची भजी छान होतात. टाकळ्याच्या पानांची भाजी छान होते व याच्या मुळांवरील गाठी जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवतात. तणनाशके वापरून जमिनीत विष मिसळण्यापेक्षा जमिनीचा कस राखणे, तण वेळीच मुळांपासून काढणे, जमिनीवर पाला पसरणे हे उपाय करावेत. खाद्योपयोगी तण असल्यास वापर करणे हे शाश्वत उपाय करणे योग्य आहे.

नाजूक निळ्या फुलाची, लांब गोल पानाची केनी अनाहूत पाहुण्यासारखी बागेत येते. पण पाने खुडून, डाळीच्या पिठात बुडवून तेलात सोडली की पानाची भजी टम्म फुगतात. ही भजी तोंडात अक्षरश: विरघळतात अन् केनी बागेत आल्याचा आनंदच होतो. असे हे तण त्यांची माहिती करून घ्या, उपयोग जाणून घ्या. मग व्यवस्थापन होईल सोपं.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)