पुणे : ‘महावितरण’ने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५ लाख ६५ हजार ‘सौर कृषी पंप’ दिले आहेत. मात्र, पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. आता मात्र महावितरणने सौर पंप बसवलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘महावितरण’ने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी“वेबसाईटवरून’ तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावर फोन करून तक्रार करणे, असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता ‘महावितरण’ने शेतकऱ्यांना मोबाईलवरील महावितरणच्या ॲपवरही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वीज ग्राहकांना वीज बिल जाणून घेणे, बिल भरणे यासह मीटर रिडिंग नोंदणी, वीज चोरी कळविणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती कळविणे, अशा विविध कामांसाठी महावितरणने मोबाईल ॲप सुरू करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना या मोबाईल ॲपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ या टॅबवर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नसणे, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकऱ्यांना या सुविधेच्या माध्यमातून करता येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला असून शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे, सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.