scorecardresearch

सावधान! उष्माघातापासून बचावासाठी तज्ज्ञांचा खबरदारीचा सल्ला, काय करावं आणि काय टाळावं? वाचा…

राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी उन्हात जाणे टाळा, उन्हात जाणे अपरिहार्य असल्यास छत्री, गॉगल वापरा आणि भरपूर पाणी प्या, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरच्या तीन दिवसात राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर जाणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घेऊन उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

तापमानातील वाढ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. त्यातून ताप, गरगरणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे असे अनेक त्रास संभवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांमध्ये, लहान मुले आणि वृद्धांमध्ये या गोष्टी टप्प्याटप्प्याने न होता एका झटक्यात होऊन हृदय आणि मेंदूच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता असते. याला वैद्यकीय परिभाषेत सन्स्ट्रोक असे म्हणतात. हे टाळण्यासाठी शक्यतो कडक उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “उष्णतेच्या लाटेमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. पाण्याची पातळी कमी होऊन उद्भवणाऱ्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी साधे पाणी पित राहणे आवश्यक आहे. फळांचे ताजे रस, लिंबू किंवा कोकम सरबत, ताक यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. डोळ्यांना गॉगल, सुती कपडे, छत्री किंवा टोपीचा वापर अनिवार्य आहे, याचे भान नागरिकांनी ठेवावे. ज्यांना कामानिमित्त घराबाहेर जाणे आवश्यक आहे, त्यांनी पाणी जवळ ठेवावे. खाण्याचा सोडा आणि मीठ घातलेले पाणी सतत पित राहिल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखणे सोपे होते.”

काय करावं आणि काय टाळावं?

  • कामानिमित्त बाहेर पडताना टोपी, छत्री, गॉगल वापरा.
  • सनस्क्रीन लोशन वापरा.
  • पाणी, फळांचे ताजे रस, सरबते, ताक प्या.
  • उन्हात बाहेर पडणे टाळा.
  • बाटलीबंद शीतपेये टाळा.

हेही वाचा : विश्लेषण : अंटार्क्टिका का तापतोय? तापमानवाढीने संशोधकही बुचकळ्यात!

बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, “मुलांना सतत पाणी पाजत राहणे तसेच कडकडीत उन्हात त्यांना घराबाहेर न जाऊ देणे आवश्यक आहे. मुलांना सैल आणि सुती कपडे घाला. उलट्या, गरगरणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important instructions by doctors amid heat wave in maharashtra for 3 days pune print news pbs