गर्दी आणि वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार

गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी सोमवारी (५ सप्टेंबर) मध्यभागातील मानाच्या पाच मंडळांसह प्रमुख मंडळांच्या परिसरात ‘जीपीएस ट्रॅकर’ यंत्रणेचा प्रायोगित तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. मध्यभागातील मानाच्या मंडळांसह प्रमुख दहा मंडळांच्या भागात होणारी गर्दी तसेच वाहतूक नियोजनासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

प्रतिष्ठापनेच्या दिवशी मानाच्या मंडळाच्या मिरवणुकांत आणि परिसरात ‘जीपीएस ट्रॅकर’ यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेचा पुण्यात पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांना गर्दीचा अंदाज बांधून वाहतुकीचे नियोजन करता येईल तसेच ज्या भागात रस्ते बंद ठेवण्यात येतील तेथील वाहतूक तातडीने पर्यायी मार्गाने वळविता येईल, अशी माहिती परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गिव्ह वे टू अ‍ॅम्ब्युलन्स उपक्रम

वाहतूक शाखेचे उपायुक्त मुंढे म्हणाले की, वाहतूक शाखेकडून प्रतिष्ठापनेच्या दिवशी ‘गिव्ह वे टू अ‍ॅम्ब्युलन्स’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचा मोबाईल क्रमांक ( ८४९१८००१००) असा आहे. शहरातील सर्व रुग्णालयांना हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर वाहतूक पोलीस तातडीने रुग्णवाहिकेला गर्दीतून वाट करून देतील. या उपक्रमासाठी मुंबईतील राधी फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. ‘रुग्णवाहिकेचा सायरन म्हणजे रुग्णाची हाक’ असे समजून वाहनचालकांनी तातडीने गती कमी करून रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन न्यावे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून द्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले.