पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२६ मार्च) राज्य, तसेच परराज्यांतून १२५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात फळभाज्यांची ९० ते ९५ ट्रक एवढी आवक झाली होती.
आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून मिळून १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ५ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून मिळून ४ टेम्पो शेवगा, मध्यप्रदेशातून १ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी १५ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले एक हजार गोणी, टोमॅटो १० हजार पेटी, भेंडी ५ टेम्पो, गवार ५ टेम्पो, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, फ्लाॅवर १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, काकडी ८ टेम्पाे, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो , कांदा १५० ट्रक अशी आवक झाली.
हेही वाचा >>> राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, चंद्रकांत पाटील यांची टिप्पणी
पालेभाज्या स्वस्त
मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडींची आवक झाली. मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिर, मेथीच्या दरात घट झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
रमजान महिन्यात रसाळ फळांना मागणी
मुस्लीम धर्मियांकडून रमजान महिन्यात उपवास केले जातात. फळांचे सेवन करुन उपवास सोडला जातो. बाजारात कलिंगड, खरबूज, अननस, पपईच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने लिंबांच्या दरात गोणीमागे २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने डाळिंबांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. फळबाजारात केरळमधून ६ ट्रक अननस, संत्री ५० ते ६० टन, मोसंबी ३५ ते ४० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे एक हजार बाराशे गोणी, कलिंगड ५० ते ६० टन, खरबूज २० ते ३० टन, पेरु २० ते २५ प्लास्टिक जाळी (क्रेट्स), चिकू एक ते दीड टन, हापूस आंबा ७ ते ८ हजार पेटी, पपई १५ ते २० टन अशी आवक झाली.
हेही वाचा >>> वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन
मासळीची आवक वाढली
पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरुन मासळीची आवक होत आहे. मासळीचे दर टिकून आहेत. मागणीपेक्षा आवक जास्त झाल्याने रहू, कतला, बांगडा, कोळंबी या मासळीच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १० रुपयांनी घट झाली आहे. मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन आवक झाली.