मद्यविक्रीचा परवाना नसताना विक्री केल्यास जागामालकांवर गुन्हे

नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री शहर आणि जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमांमध्ये मद्यविक्री देखील सर्रास केली जाते. परंतु, मद्यविक्री परवाना नसताना मद्यविक्री केल्यास कार्यक्रमांचे आयोजक आणि संबंधित जागामालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून शहरासह जिल्ह्य़ात अवैध मार्गानी आलेल्या दोन ठिकाणच्या मद्यसाठय़ांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे घातले आणि साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी पुण्यासह उपनगरांमध्ये पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. अशा पाटर्य़ामध्ये सर्रासपणे मद्यसेवन केले जाते. मात्र, पार्टी होणाऱ्या ठिकाणी मद्यविक्रीचा परवाना असेल, तरच मद्यविक्री करता येणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी अवैध मार्गाने परराज्यातून देशी, विदेशी मद्य आणले जाते. घोरपडी गावातील एका घरात गोवा व हरियाणा येथील बनावटीचे विदेशी मद्य असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. माहितीची खातरजमा करून विभागाच्या भरारी पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा घातला. तेव्हा विदेशी मद्याच्या हरियाणा राज्यातील बनावटीच्या १९ बाटल्या, गोवा राज्यातील बनावटीच्या १० बाटल्या आणि अन्य अशा मद्याच्या तब्बल ३८९ बाटल्या हाती लागल्या. भरारी पथकाने मणिकंदन गोपालन नायर (वय ५८, रा. सर्वेक्षण क्र. ४५ शक्ती नगर, घोरपडी) याला अटक केली असून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यासह दोन लाख १३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नायर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दापोडी येथेही अशाच पद्धतीने मद्याचा साठा करण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार भरारी पथकाने दापोडी येथील आनंदवन काटे वस्तीमधील शंभुराजे चिकन अ‍ॅण्ड एग्ज सेंटर येथे छापा टाकला. या ठिकाणीही हरियाणा राज्यातील बनावटीच्या मद्याच्या १०३ बाटल्या, गोवा राज्यातील बनावटीच्या १२७ बाटल्या असा एक लाख ४४ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुकानाचा मालक पळून गेल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक राजेंद्र झोळ, कैलास वाळुंजकर आदींनी भाग घेतला.

३१ डिसेंबरला प्रतिबंधात्मक कारवाई

३१ डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या ठिकाणीही मद्यविक्री केली जाते. परंतु, मद्यविक्री परवाना असलेली दुकाने वगळून कोठेही, कोणालाही मद्यविक्री करता येणार नाही. मद्यपरवाना नसताना मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यक्रमांचे आयोजक आणि संबंधित जागामालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. ३१ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईपेक्षा नववर्षांचे स्वागत शहरासह जिल्ह्य़ात सुरळीत पार पडावे, या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस आयुक्त, ग्रामीण अधिक्षकांशी संपर्क साधून एकत्रित एक चमू तयार करण्यात येणार आहे.

मोहन वर्दे, अधीक्षक पुणे विभाग, राज्य उत्पादन शुल्क