Premium

‘आळंदी बंद’ अखेर मागे, ग्रामस्थांचा मोर्चा; “वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही” – विश्वस्त राजेंद्र उमाप

सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आळंदी ग्रामस्थ हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

alandi bandh withdrawn, alandi villagers protest march
'आळंदी बंद' अखेर मागे, ग्रामस्थांचा मोर्चा; "वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही" – नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

आळंदी : ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानच्या विश्वस्त निवडीवरून आज ‘आळंदी बंद’ची हाक दिली होती. सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आळंदी ग्रामस्थ हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यावर नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेच्या काळात वारकऱ्यांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. मुळात त्यांची जी मागणी आहे, ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी असे आंदोलन करणे योग्य नसल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आळंदीच्या देवस्थान विश्वस्त पदावर डावलल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी आळंदी बंदची हाक दिली. दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही वेळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी आळंदी बंदचा निर्णय मागे घेतला आहे. नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप म्हणाले, वारकऱ्यांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही. कोणालाच ते आवडलेले नाही. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची आमची भूमिका आहे. १४ दिवस झाले आम्ही कार्यभार सांभाळत आहोत. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता. त्यांनी तसा संवाद साधला नाही. कालही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आजही पायरी पूजन झाल्यानंतर चर्चेचे आवाहन केले. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या अडचणी या प्रशासनाशी आहेत.

हेही वाचा : विश्वस्त निवडीत डावलल्याने आळंदीकरांचा निषेध मोर्चा, वारकऱ्यांची गैरसोय

पुढे ते म्हणाले, आमची निवड ही पुणे जिल्हा सत्र न्यायाधीशांनी केली आहे. विश्वस्त निवडीची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जायला हवं. त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आजपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी असं टोकाचं पाऊल उचलणं माझ्या दृष्टीने संयुक्तिक नाही. आजच्या दिवशी गावकऱ्यांची दुकाने बंद करणे संयुक्तिक नाही. ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या नक्कीच विचारात घेतल्या जातील. सकारात्मक चर्चा करू, आज ही आम्ही तयार आहोत. चर्चेतून मार्ग निघेल, आमच्या पातळीपर्यंत आम्ही प्रश्न सोडवू, आमचा त्यांच्या मागणीला आक्षेप नाही. त्यांची मागणी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यांनी असे आंदोलन करणे योग्य नाही, असे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In alandi call for alandi bandh withdrawn after the villagers protest march trustee rajendra umap kjp 91 css

First published on: 05-12-2023 at 15:04 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा