शेतक ऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत वाटचाल करणार आहे. प्रसंगी संघटना स्वबळावर नऊ जागा लढवेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. समविचारी पक्षामध्ये आम आदमी पक्षाचाही (आप) समावेश असू शकतो, असेही ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील नेत्यांना सत्तेचा दर्प आणि माज आला असल्याची टीका करून शेट्टी म्हणाले, सध्या तरी तिसरी आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आम आदमी पक्ष असे सर्व पर्याय खुले आहेत. मात्र, हे शक्य न झाल्यास संघटनेची बांधणी भक्कम आहे, अशा राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, माढा, बारामती, उस्मानाबागद, बुलडाणा आणि नांदेड अशा नऊ ठिकाणी पक्ष स्वबळावर लढेल.
भ्रष्टाचाराला विरोध या मुद्दय़ावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अरिवद केजरीवाल यांच्याशी आपले एकमत आहे. केजरीवाल यांना आंदोलनामध्ये सहकार्य करू. पण, थेट परकीय गुंतवणुकीसंदर्भात (एफडीए) त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत राजकीय मैत्री करण्यामध्ये मर्यादा येतात. पुढील आठवडय़ामध्ये आपली केजरीवाल यांच्याबरोबर भेट होण्याची शक्यता आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
कारखान्यांचे गाळप सुरू होऊनही अनेक कारखान्यांनी शेतक ऱ्यांना अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. हा ऊस नियंत्रण कायद्याचा भंग असून यासंदर्भात ज्यांच्या मालकीचे कारखाने आहेत अशा नेत्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. ऊस आंदोलनाचा दुसरा टप्पा १ जानेवारीपासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. १ जानेवारीला सातारा आणि २ जानेवारीला सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ८ जानेवारी रोजी मंचर येथे सभा होणार असून ९ जानेवारीला बारामती येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये साखर गोदामातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
‘मी कारखाना चालवायला तयार’
माझ्या तालुक्यातील दौलत कारखान्याच्या २७० कोटी रुपयांच्या कर्जाचे पितृत्व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वीकारावे. हे कर्ज पवार यांच्यामुळेच झाल्याचा आरोप त्यांचेच अनुयायी असलेल्या माजी आमदार नरसिंग पाटील यांनी केला आहे. पवारांनी हे पितृत्व स्वीकारले, तर मी तो कारखाना चालवायला तयार आहे, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.