पुणे : पतीच्या निधनानंतर एकट्या राहणाऱ्या डाॅक्टर महिलेशी ओळख वाढवून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने डाॅक्टर महिलेची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅक्टर महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्या एकट्या राहत होत्या. आरोपीने त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला. एका हाॅटेलमध्ये नकळत मोबाइलवर त्यांची छायाचित्रे काढली. तक्रारदार डाॅक्टर महिला ज्या रुग्णालयात काम करत होत्या तेथे आरोपी गेला. त्याने त्यांना धमकाविले होते.
आरोपीच्या पत्नीने नकळत काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. डाॅक्टर महिलेच्या मुलीला मारण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेच्या भावाला छायाचित्रे पाठवून बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.