पुणे : नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीनांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहायला आहे. मुलाने शाळेतील एका मुलीबाबत अपशब्द उच्चारल्याने अल्पवयीन मुले चिडली होती. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तो शाळेत निघाल होता. टिळेकरनगर परिसरातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीनांनी मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. एकाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करुन अल्पवयीन पसार झाले.
हेही वाचा…बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी राज्यात ऑपरेशन ‘मुस्कान मोहीम’लोकसत्ता प्रतिनिधी
गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडकरांचा मार्ग खडतर
किरकोळ वादातून गंभीर गुन्हे
अल्पवयीनांमधील किरकोळ वादातून गंभीर गुन्हे घडतात. आठवड्यापूर्वी हडपसर भागातील एका शाळेत वार्षिक समारंभातील वादातून एका वर्गमित्राचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. वर्षभरापूर्वी भवानी पेठेतील एका शाळेच्या आवारात वादातून शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते.