पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) अभ्यासक्रमांकडे देशभरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र असून, ‘आयसर’ची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन वर्षांत सुमारे दुपटीने वाढली आहे. जोडीने उपलब्ध अभ्यासक्रमांच्या जागाही वाढत आहेत.
सन २०२२-२३पर्यंत ‘आयसर’मधील प्रवेशासाठी जेईई, केव्हीपीवायच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत होती. मात्र, २०२४-२५मध्ये पहिल्यांदा ‘आयसर’च्या प्रवेशासाठी स्वतंत्र आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट (आयएटी) ही प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये सात ‘आयसर’मध्ये मिळून उपलब्ध १८०० जागांसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी सुमारे ९५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, यंदा (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) सुमारे २३०० जागांसाठी सुमारे १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला.
‘‘आयसर’मध्ये काळानुरूप विज्ञानाचा परिघ विस्तारतो आहे. उदाहरणार्थ, क्वांटम तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, भूविज्ञान अशा विषयांचेही अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. येत्या काळात विषयांची व्याप्ती वाढेल, तशी विद्यार्थिसंख्याही वाढेल,’ असा अंदाज आयसर, कोलकाताच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद नातू यांनी व्यक्त केला.
आयसर हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील स्वायत्त उच्च शिक्षण संस्था समूह आहे. पुण्यासह भोपाळ, कोलकाता, तिरुपती, मोहाली, तिरुअनंतपुरम, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसर कार्यरत आहेत. आयसरमध्ये मूलभूत विज्ञानासह मानव्यविज्ञान, पर्यावरणशास्त्र अशा शाखांतील पदवी-पदव्युत्तर पदवी, पीएचडीसारखे संशोधन अभ्यासक्रम चालवण्यात येतात. पदवी-पदव्युत्तरचे एकात्मिक (बीएस-एमएस) अभ्यासक्रम हे ‘आयसर’चे वैशिष्ट्य मानले जाते. २००६मध्ये स्थापना झाल्यापासून अल्पावधीतच प्रमुख विज्ञान शिक्षण, संशोधन संस्था म्हणून देशात ‘आयसर’चे नाव घेतले जाते.
‘आयसर’कडे विद्यार्थ्यांचा ओढा नक्कीच वाढतो आहे. विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे डोळसपणे पाहू लागल्याचे हे द्योतक आहे. सध्याच्या सेवा आधारित अर्थव्यवस्थेपासून ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था होण्याकडील हे पहिले पाऊल आहे. – डॉ. अरविंद नातू, अध्यक्ष, नियामक मंडळ, आयसर, कोलकाता