पुणे : मोशी परिसरात तीन वर्षांची चिमुरडी खेळताना दुसऱ्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून खाली पडली. बेशुद्धावस्थेत असलेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने तिचा जीव वाचविण्यात यश आले.
पुण्यातील मोशी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी आहे. ती खेळताना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. शेजाऱ्यांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती. पालकांनी तिला तातडीने अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे नेले. तिला बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिला २४ तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिच्या सीटी स्कॅन तपासणीमध्ये कवटीच्या हाडाचे फ्रॅक्चर आढळले.
मुलीच्या मेंदूवर दबाव येऊन प्रकृती खालावल्यामुळे मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी व रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत झालेले उपचार आणि शस्त्रक्रियेमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद जंबगी, बालरोग चेताविकारतज्ज्ञ डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजित घंगाळे यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वी उपचार केले. याबाबत डॉ. मिलिंद जंबगी म्हणाले की, उंचावरून खाली पडल्याने लहान मुलांच्या मेंदूला दुखापत होऊ शकते. ती नंतर गंभीर रूप धारण करू शकते. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ती कोमात होती. तिची प्रकृती बिघडू लागल्याने ताबडतोब तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही मुलगी बरी होत असून पुन्हा सामान्यपणे आयुष्य जगण्यासाठी तयार आहे.
तातडीने उपचार आवश्यक
मुलांमध्ये मेंदूला झालेल्या दुखापतीवर उपचारांसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. उपचारांस विलंब झाल्यास चेतासंस्थेशी निगडित गंभीर समस्या उद्भवू शकतात. यातून रुग्णाची विचार करण्याची, हालचाल करण्याची किंवा जगण्याची क्षमता कमी होऊ शकते, असे डॉ. शिजी चालीपट यांनी सांगितले.