पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिका-यांची नाराजी आहे. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बहल यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बनसोडे यांच्यावर तोफ डागली. पक्षाकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक काळूराम पवार, जितेंद्र ननावरे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे देखील अजितदादांना, मलाही भेटले. चाबुकस्वार तीव्र इच्छुक आहेत. आरपीआएच्या चंद्रकांता सोनकांबळे देखील इच्छुक आहेत. त्या आमच्या पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्या उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. भाजपचे राजेश पिल्ले, तेजस्विनी कदम याही अजितदादांना भेटले आहेत.
हेही वाचा : पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले
भाजपच्या पदाधिका-यांशीही अजित पवार चर्चा करत आहेत. कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, सर्वांशी चर्चा करण्याची माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यानंतरच पिंपरीचा निर्णय घेतला जाईल. दोन दिवसात उमेदवार ठरेल. याचा अर्थ अण्णा बनसोडे यांना उमेदवारी द्यायची नाही किंवा नवीन उमेदवार द्यायचा नाही असाही नाही. कोणत्याही परिस्थितीत पिंपरीची जागा घालवली जाणार नाही. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. मूल्यमापन करून निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाईल. आमदार बनसोडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते रुग्णालयात होते. त्यामुळे बनसोडे भेटत नव्हते अशा तक्रारी आमच्या पक्षातील लोकांच्या होत्या. परंतु, आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत. नवीन चेहरा देण्याची लोकांची मागणी आहे. पिंपरीत राष्ट्रवादीचाच आमदार होईल. कोणीही नवीन आमदार आला तरी त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचेही चांगल्या माणसाला उमेदवारी द्यावी असे मत आहे. चेहरा बदली करायचा असेल तर जितेंद्र ननावरे यांना उमेदवारी द्या. मी झोकुन देऊन काम करणार असल्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिल्याचे देखील बहल यांनी सांगितले.