पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस तपासात ही पिस्तुले धुळे जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये आणल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सुहास उर्फ पिल्या बालाजी गायकवाड, अभय विकास सुरवसे, ओमकार सिद्धेश्वर बंडगर, समीर लक्ष्मण इजगज आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यापैकी सुहास गायकवाड, अभय सुरवसे, ओमकार बंडगर आणि समीर इजगज हे एकाच टोळीचे सदस्य असून त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पहिली कारवाई चौघांकडून चार पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त, दुसरी कारवाईमध्ये समीर इजगजकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त आणि तिसरी कारवाईमध्ये धर्मेंद्र सेनेकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. ही शस्त्रे नेमकी कशासाठी, कुणासाठी किंवा कोणताही घातपात करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. आरोपींना आळंदी, वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त झाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.