पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नैसर्गिक ओढे, नाल्यांवर अतिक्रमण करून पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या जागा मालक आणि व्यावसायिक अशा आठ जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कर्मचारी हरीश अंगद माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जागा मालक आणि व्यावसायिक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे, नाल्यांभोवती अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पाण्याचा प्रवाह अडविला आहे. ओढे, नाल्याचा प्रवाहाची दिशा बदलली. त्यावर अनधिकृत बांधकामे केली. त्यामुळे काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रस्ते जलमय झाले होते. ‘आयटीपार्क वॉटरपार्क’ झाले होते. लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या अनुषंगाने हिंजवडीत नाल्या लगत, नाल्याच्या पात्रात अनधिकृत बांधकाम करणारे जागा मालक, व्यावसायिक यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण, जल प्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

मारुंजी भागातील अनधिकृत बांधकाम आणि इमारतींवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू आहे. आठ, चार आणि दोन मजली अशी तीन अनधिकृत बांधकामे असलेल्या इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. पाच मजली इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. तर, एका पाच मजली इमारतीचे २० टक्के बांधकाम पाडले. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई थांबविण्यात आल्याचे पीएमआरडीएच्या प्रशासनाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जागा व्यावसायिकांना भाड्याने दिल्या आहेत. चार जागा मालक आणि चार व्यावसायिक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.