पिंपरी : पिंपरी येथे एका पान टपरीजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पोलिसांना तक्रार करणार काय, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत दोघांनी एका तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना पिंपरीत घडली.या प्रकरणात ३३ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी पुलाखाली पान टपरीजवळ थांबले असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. आरोपीने फिर्यादीचा शर्ट धरून शिवीगाळ करत, आमच्याविरूद्ध तू पोलिसांना तक्रार करणार काय, आम्ही इथले भाई आहोत, तुला आज खल्लास करून दाखवून देऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने कमरेला लपवून ठेवलेली तलवार काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. फिर्यादीने वार चुकवण्याचा प्रयत्न केला असता, तो वार त्यांच्या डाव्या काखेजवळ लागून गंभीर दुखापत झाली. फिर्यादी खाली पडल्यावर आरोपीने तलवार हिसकावून पोटात तलवार खुपसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी निसटण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या डाव्या बरगडीस लागून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी तलवार हवेत फिरवत ओरडून परिसरात दहशत पसरवून तेथून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण

बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर चिंचवड येथे दोन तरुणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात रस्त्यावर पडलेला दगड मारून दुखापत केली. ही घटना रामनगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ घरासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. ‘आमचेकडे का बघता’ असे विचारून वाद घातला. आरोपीने फिर्यादीच्या थोबाडीत मारले. त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे घरातील लोक आणि शेजारी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

अतिक्रमण कारवाईत अडथळा, आठ जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण पथक शासकीय कर्तव्य करत असताना आठ जणांनी जमाव जमवून त्यांना अडथळा निर्माण केला. ही घटना रहाटणी फाटा, काळेवाडी येथे घडली. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पथक अतिक्रमण कारवाईचे शासकीय कर्तव्य करत होते. यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून, फिर्यादी व त्यांच्या पथकाला कायदेशीर शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला आणि त्यांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

देहुरोड येथील थॉमस कॉलनीजवळ अमली पदार्थ गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी कब्जात बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्याला गांजा पुरवणाऱ्या दुसऱ्या आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विधाते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्दीकी अताऊर रेहमान शेख (२९, आंबेडकरनगर झोपडपट्टी, देहुरोड) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्दीकी याच्या ताब्यात एकूण १३ हजार १५० रुपये किमतीचा २६३ ग्रॅम वजनाचा गांजा, हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा अटकेत

बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. ही कारवाई अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरुनगर, पिंपरी येथे करण आली. याप्रकरणी पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शैलेश उर्फ सुच्या विजय कसबे (३२, गंजपेठ, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, अशी एकूण ५१,००० रुपये किमतीची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.