पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटार ही विनानोंदणी रस्त्यावर धावत होती आणि अल्पवयीन मुलगा ती चालवत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विनानोंदणी वाहने आणि अल्पवयीन चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मागील दोन आठवड्यांत शहरातील रस्त्यांवर विनानोंदणी धावणारी ११ वाहने सापडली असून, ३ अल्पवयीन चालकही आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरटीओने २२ मे ते १ जून या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत ११ विनानोंदणी वाहने आढळली. त्यातील बहुतांश दुचाकी आहेत. नोंदणी न करता वाहने ग्राहकांच्या हाती देणाऱ्या वाहन विक्रेत्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. आरटीओने पुण्यातील अशा विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी विचारणा केली आहे. दुसऱ्या आरटीओच्या कार्यकक्षेतील विक्रेता असेल तर संबंधित आरटीओला पत्र पाठवून कारवाईची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांनी दिली.

हेही वाचा : पार्टीसाठी चाललेल्या तरुणांच्या मोटारीची दुचाकीला धडक; मजुराचा मृत्यू, कल्याणीनगरनंतर शिरुरमध्ये अपघात

आरटीओकडून वाहन चालविणाऱ्या ३ अल्पवयीन मुलांवरही कारवाई करण्यात आली आहे. या मुलांच्या पालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पाल्य अल्पवयीन असूनही त्याच्या हाती वाहन दिल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे. याचबरोबर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यात आनंद सरींचा वर्षाव; मोसमी पाऊस दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्रात दाखल

आरटीओची २२ मे ते १ जून कारवाई

  • विनानोंदणी वाहन चालविणे – ११
  • मद्यप्राशन करून वाहन चालविणे – ५७
  • अल्पवयीन असूनही वाहन चालविणे – ३
  • रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक – ५२