पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबवेवाडीत झालेल्या वाहन तोडफोड प्रकरणाचा दाखला देत पिंपरी-चिंचवड पोलिसांनाही गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर दोनच दिवसात सराईत गुन्हेगार असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने चिखलीत १२ वाहनांची तोडफोड केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खंडणी दिली नाही म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या १२ वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखलीतील मोरे वस्ती येथील पिंपरी – चिंचवड महापालिका शाळेच्या परिसरात रविवारी ९ फेब्रुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अल्पवयीन मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मोटार चालकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. मोरे वस्ती परिसरातील रहिवाशी आपली मोटार, टेम्पो, रिक्षा अशी वाहने रस्त्याकडेला उभी करतात. मद्यपान करून आलेल्या सराईत गुन्हेगार असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने फिर्यादी मोटार चालक हे त्यांची मोटार रस्त्याकडेला उभी करीत असताना त्यांच्याजवळ गेला. त्यांना धमकावत खंडणीची मागणी केली. मात्र, मोटारचालकाने खंडणी देण्यास नकार देताच आरोपी मुलाने दगडाने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर परिसरात दहशत माजवण्यासाठी त्याने आजुबाजूच्या कार, टेम्पो, रिक्षा अशा बारा वाहनांची तोडफोड केली. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटार चालकाने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. चिखली पोलीसांनी तातडीने तपास करीत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 12 vehicles vandalized by criminals at chikhali pune print news ggy 03 css