पुण्यात आज दिवसभरात नव्याने १५९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१ एवढी झाली तर दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन महिलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

पुण्यात आजच्या ६ मृतांममुळे करोनाबाधित मृतांची एकूण संख्या ३७८वर पोहोचली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ८५ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५ हजार १९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील आनंद नगर येथील ५८ आणि ६० वर्षीय दोन महिलांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शहरातील बाधितांची एकूण संख्या ७६८ वर पोहचली असून यांपैकी ४३८ जण बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज बाधित आढळलेले रुग्ण हे आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरी गांव, जुनी सांगवी, पाटीलनगर चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे आणि मुंबई येथील रहिवासी आहेत.