पुणे : सहकारनगर भागात पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. सात्विक सचिन इंगळे (वय १९), साहिल उर्फ सच्च्या हनीफ पटेल (वय २१, दोघे रा. पर्वती), प्रथम उर्फ पेंडी सुरेश म्हस्के (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पटेल आणि म्हस्के सराईत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण गस्त घालत होते. त्यावेळी सहकारनगर भागात एकजण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सोनुने, चव्हाण यांना मिळाली. हेही वाचा : अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ६८ अभ्यासक्रम; बार्टी, एनआयईएलआयटीतर्फे उपक्रम पोलिसांच्या पथकाने सापळा लावून इंगळेला पकडले. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत पटेल आणि म्हस्के यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दोघांकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदुकुमार बिडवई, उपनिरीक्षक नितीन कांबळे, मोहसीन शेख, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.