पुणे : म्हाडाच्या पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने २५ ते ३० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेखा उर्फ कलावती भगवान कांबळे, भगवान कांबळे (दोघे रा. नवीन म्हाडा वसाहत, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शंकर दिनकर कांबळे (वय ६५, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे आणि आरोपी दाम्पत्य नातेवाईक आहेत. आरोपींनी म्हाडा कार्यालयात कामाला असल्याची बतावणी कांबळे यांच्याकडे केली होती. म्हाडाच्या पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. कांबळे यांच्याकडून त्यांनी १६ हजार रुपये घेतले. घर मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपी कांबळे दाम्पत्याने २५ ते ३० जणांकडून पैसे घेतले होते. हेही वाचा : आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’; पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील उपक्रम कांबळे यांनी घराबाबत आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपी रेखा हिने पैसे मागितल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्यांना दिली. त्यानंतर रेखाचा पती आरोपी भगवान याने कांबळे यांना गुंडांकडून मारहाण करण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या कांबळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर आरोपींविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.