पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पोटात चाकूने भोसकले आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत सहा अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत.
हेही वाचा : पूना हॉस्पिटल जवळील यशवंतराव चव्हाण पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद
अगदी किरकोळ कारणावरून सहा अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करत चाकूने भोसकले आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी पिंपरीतील नामांकित शाळेत घडली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलाची इतर अल्पवयीन मुलांनी स्कुल बॅग ओढली, ती फाटली. यावरून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुलांनी फिर्यादी अल्पवयीन मुलाला शाळेत आल्यानंतर चाकूने भोसकून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर घटनेनंतर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या घटनेतील मुलांना समजपत्र दिले आहे. पिंपरी पोलिसांत अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा प्रयत्न हे कलम लावण्यात आले आहे.