पुणे : गावाक़डे प्रेमसंबंध असतानाही दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी प्रेयसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गौरी लणेश आरे (वय २५, रा. कळस माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अमोल दिलीप कांबळे (वय २५, रा. श्रमिकनगर, धानोरी) याला अटक केली आहे. याबाबत लणेश धनाजी आरे (वय २४, रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस माळवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे ही वाचा…Pune : “कामाच्या ताणामुळेच माझ्या लेकीचा मृत्यू”, आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सासर आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला आहे. ती कळस येथे रहायला आली. आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्गमित्र होता. गौरी हिने त्याच्यासोबत लग्न न केल्याचा त्याला राग होता. लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल याने खूप प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला गौरी पुण्यात कळस येथे रहात असल्याचे समजले. त्यानुसार तो कळस येथे आला.

हे ही वाचा…‘विघ्नहर्ता न्यास’च्या वैद्यकीस सेवेचा ५८२ नागरिकांना लाभ

कळस माळवाडी येथील ट्रिनिटी स्कुलसमोरील रस्त्यावरून गौरी तिच्या मैत्रिणीबरोबर रात्री सव्वाआठ वाजता पायी घरी येत होती. त्यावेळी अमोल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी सात वाजता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मतराव जाधव यांनी सांगितले.